टीजेएसबी सहकारी बँकेच्या वार्षिक नफ्यात लक्षणीय वाढ झाली असून बँकेने व्यावसायिक नफ्याचे आणि शाखांचे शतक पूर्ण केले आहे. २०१४-१५ आर्थिक वर्षांत बँकेला झालेला १०१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा निश्चितच लक्षणीय आहे, असे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश उतेकर यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सरलेल्या आर्थिक वर्षांतील टीजेएसबीच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बँकेचे अध्यक्ष नंदगोपाल मेनन, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप ठाकूर, विद्यमान संचालक व माजी अध्यक्ष विद्याधर वैशंपायन, तसेच अन्य संचालक, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
टीजेएसबी आपल्या ११० शाखांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, गुजरात या राज्यांत सेवा देत आहे.
टीजेएसबी बँकेचा एकूण व्यवसाय ११,६०० कोटी रुपयांचा झाला असून व्यवसायाच्या प्रमाणात बँकेने मिळवलेला १६२ कोटींचा ढोबळ, तर १०१ कोटींचा निव्वळ नफा खासच उल्लेखनीय आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रातील हा उच्चांक असल्याचे उतेकर यांनी सांगितले.
पारदर्शक व्यवहार, आधुनिक बँकिंग तंत्रज्ञानाचा अवलंब, व्यावसायिक व्यवस्थापन आणि कुशल मनुष्यबळाच्या जोरावर टीजेएसबीने हे यश मिळवल्याचे मत त्यांनी मांडले. गेल्या वर्षीच्या सर्वसाधारण सभेत ज्या मुद्दय़ांची चर्चा झाली. त्या सर्वाची पूर्तता बँकेने यशस्वीपणे केलेली आहे. मार्च २०१६ पर्यंत टीजेएसबी बँकेच्या १२५ शाखा पूर्ण होतील, असा विश्वास उतेकर यांनी व्यक्त केला.