नवीन १८ शाखा उघडण्याचे नियोजन
पहिल्या तीन सहकारी बँकांमध्ये स्थान राखणाऱ्या टीजेएसबी सहकारी बँकेने चालू आर्थिक वर्षांत नव्या १८ शाखा सुरू करण्याचे ध्येय राखले आहे. यामुळे मार्च २०१७ पर्यंत बँकांची एकूण शाखा संख्या १३३ होईल. बँकेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निव्वळ नफा कमाविला आहे. सलग सहाव्या वर्षी बँकेला ही किमया राखता आली आहे.
टीजेएसबी सहकारी बँकेच्या सध्या महाराष्ट्रासह गुजरात, गोवा आणि कर्नाटकात ११५ शाखा आहेत. २०१५-१६ या आर्थिक वर्षांत बँकेने एकूण १२,८७८.८५ कोटी रुपयांचा व्यवसाय पूर्ण केला आहे. बँकेला या कालावधीत १००.३४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेकडे ८,१२२.०५ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. तर ४,७५६.८० कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे.
टीजेएसबी सहकारी बँकेच्या २०१५-१६ या आर्थिक वर्षांतील कामगिरीची माहिती देण्यासाठी मंगळवारी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या वेळी बँकेचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे, अध्यक्ष सी. नंदगोपाल मेनन, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप ठाकूर, माजी अध्यक्ष विद्याधर वैशंपायन आदी उपस्थित होते.
जगभरातील आर्थिक क्षेत्रात निर्माण होणारी आव्हाने, मंदीचे भय, नव्या बँक परवान्यांमुळे बँकिंग क्षेत्रात निर्माण होणारी स्पर्धा या पाश्र्वभूमीवर टीजेएसबी बँकेने यंदाच्या आर्थिक वर्षांत शंभर कोटी नफ्याचा पल्ला गाठला आहे;
आपल्या आर्थिक प्रगतीमध्ये सातत्य राखून बँकेने ही परंपरा कायम राखली आहे, असे मत बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे यांनी व्यक्त केले.
या वर्षी बँकेला परकी चलन व्यवसायाचा कायमस्वरूपी (एडी) परवाना मिळाला असल्याचे साठे यांनी या वेळी सांगिले. चालू वर्षांत बँक मध्य प्रदेशात आपल्या व्यवसायास प्रारंभ करणार असून एनपीसीआय (भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम) युनिफाइड पेमेंट इंटरफेस सिस्टीमद्वारे कामकाज करणारी टीजेएसबी देशातील पहिली सहकारी बँक ठरली असल्याचे साठे म्हणाले.
वार्षिक तुलनेत बँकेच्या एकूण ठेवी तसेच कर्ज वितरणात वाढ झाली असली तरी ढोबळ व निव्वळ नफ्यात मात्र किरकोळ घसरण झाली आहे. बँकेच्या ढोबळ आणि निव्वळ अनुत्पादित कर्ज प्रमाणातही यंदा नाममात्र वाढ झाली आहे. बँकेने गेल्या आर्थिक वर्षांत भांडवल पर्याप्ततेचे १३.३१ टक्क्यांचे प्रमाण राखले आहे.