भारतात जागतीक दर्जाच्या कौशल्य प्रशिक्षण संस्था उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याअनुषंगाने मुंबईत भारतीय कौशल्य संस्था उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय कौशल्य विकास मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांड्ये यांनी केली. सोमवारी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेला भेट दिल्यानंतर ते बोलत होते.

पांड्ये म्हणाले, सार्वजनिक-खासगी भागीदारीतून हा प्रकल्प राबवला जाणार असून भारतीय कौशल्य संस्थेचे बांधकाम टाटा एज्युकेशनल ॲण्ड डेव्हलपमेंट ट्रस्ट करणार आहे. यासाठी टाटासमूह सुमारे ३०० कोटी रुपये गुंतवणार असून सरकार या प्रकल्पासाठी सुमारे ५ एकर जमीन देणार आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये या संस्थेची पायाभरणी होईल अशी आशा त्यांनी या वेळी व्यक्त केली.

१० हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्याची या संस्थेची क्षमता असेल. पारंपरिक क्षेत्राबरोबरच सुरक्षा, अंतराळ, पोलाद आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातही ही संस्था कौशल्य प्रशिक्षण पुरवणार आहे. भविष्यात अहमदाबाद आणि कानपूर येथेही अशा प्रकारच्या संस्था उभारल्या जातील. मुंबईतल्या राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठीही पावले उचलण्यात आल्याचे यावेळी पांड्ये यांनी सांगितले.

राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेला भेट दिल्यानंतर पांड्ये यांनी तिथल्या प्रशिक्षणार्थीशी संवाद साधला. तसेच या संस्थेच्या आवारातील प्रस्तावित कौशल्य संस्थेच्या जागेला ही भेट दिली. यावेळी कौशल्य विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केल्यामुळे देशातल्या कौशल्य विकास चळवळीला चालना मिळाली असून त्याकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.