२०१८-१९ मध्ये अवघी २.७० टक्के वाढ

रोकड चणचण, वाढत्या किंमती, इंधनदर भडका आदींमुळे गेल्या आर्थिक वर्षांत देशांतील प्रवासी वाहन विक्री काही प्रमाणातच वाढली आहे. २०१८-१९ मध्ये प्रवासी वाहन विक्री २.७० टक्क्य़ांनी वाढली आहे.

सार्वत्रिक निवडणुका व कंपन्यांचे तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या प्रतिक्षेत खरेदीदारांनी गेल्या वर्षांत वाहनांना कमी पसंती दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षभरात इंधनाच्या अस्थिर दरांचाही वाहन खरेदीवर परिणाम झाला आहे.

वाहन उत्पादक कंपन्यांची संघटना असलेल्या ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स’ (सिआम) च्या आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षांत एकूण ३३,७७,४३६ वाहने विकली गेली आहेत. आधीच्या वित्त वर्षांतील वाहन विक्रीची संख्या ३२,८८,५८१ होती.

गेल्या आर्थिक वर्षांत बाजारात नवीन वाहने येऊनही कमी मागणीमुळे संघटनेने संपूर्ण वित्त वर्षांकरिता आधी व्यक्त केलेला ८ ते १० टक्के विक्री वाढीचा अंदाज ६ टक्क्य़ांवर आणला होता. मात्र प्रत्यक्षात हे प्रमाण त्यापेक्षाही निम्मे आहे.

गेल्या आर्थिक वर्षांत देशांतर्गत प्रवासी वाहन विक्री २२,१८,५४९ झाली आहे. आधीच्या २१,७४,०२४ वाहनांच्या तुलनेत यंदा त्यातील वाढ २.०५ टक्के नोंदली गेली आहे.

गेल्या आर्थिक वर्षांत प्रवासी वाहनांची निर्यात मात्र ९.६४ टक्क्य़ांनी कमी होत ६,७६,१९३ झाली आहे. २०१७-१८ मध्ये वाहनांची निर्यात ९,२२,३२२ होती. तर बहुपयोगी वाहनांची विक्री गेल्या आर्थिक वर्षांत २.०८ टक्क्य़ांनी वाढून ९,४१,४६१ झाली आहे. वर्षभरापूर्वी ती ७,४८,३६६ होती.

गेल्या वर्षभरातील वाहन उद्योगाच्या प्रवासाबाबत ‘सिआम’चे अध्यक्ष राजन वढेरा यांनी सांगितले की, गेले वर्ष वाहन उद्योगासाठी आव्हानात्मक राहिले आहे. या दरम्यान वाहनांच्या सुटय़ा भागाच्या किंमतीही वाढल्या आहेत. परिणामी उत्पादकांनाही वाहनांच्या किंमती वाढवाव्या लागत आहेत. वाढते इंधनदर, वाढता विमाखर्च यांचाही परिणाम वाहन खरेदी-विक्रीवर झाला आहे.

चालू आर्थिक वर्षांतही वाहन निर्मिती उद्योगापुढे काही आव्हाने आहेतच, असे नमूद करत वढेरा यांनी, येत्या काही महिन्यांमध्ये प्रदुषण तसेच सुरक्षाविषयक काही तरतुदी नव्याने लागू होत असल्याचे नमूद केले. त्याचाही काही खर्च वाढणारच असल्याचे स्पष्ट करत या चालू वित्त वर्षांत प्रवासी वाहन उद्योगाची वाढ ३ ते ५ टक्के असेल, असे सांगितले.

देशातील दुचाकी विक्री चालू आर्थिक वर्षांत ५ ते ७ टक्के राहण्याची अपेक्षा व्यक्त करतानाच वढेरा यांनी, व्यापारी वाहनांबाबतचा अंदाज १० ते १२ टक्के बांधला आहे. तर तीन चाकी वाहनांची विक्री वाढ ७ ते ९ टक्के होईल, असे सांगण्यात आले आहे.

सर्व गटातील वाहनांमध्ये यंदा ५.१५ टक्के वाढ झाली आहे. ही संख्या २.६२ कोटी आहे. गेल्या एकूण आर्थिक वर्षांत सर्व प्रकारची वाहने मिळून १४.२१ टक्के घसरण नोंदली गेली आहे.

‘जीएसटी’ दिलाशाची अपेक्षा

महिनागणिक विक्री घसरणीचा सामना करणाऱ्या देशातील प्रवासी वाहने तसेच दुचाकीवरील वस्तू व सेवा कर कमी करण्याची मागणी उद्योगाने सरकारकडे केली आहे. या क्षेत्रातील सध्याचा अप्रत्यक्ष कर २८ टक्क्य़ांवरून १८ टक्के करण्याचा आग्रह धरण्यात आला आहे. प्रदुषणविषयक आणि सुरक्षिततेविषयक नवे मापदंड राबवावे लागत असल्याने वाहनांच्या किंमती येत्या कालावधीत १० ते १५ टक्क्य़ांनी वाढवाव्या लागतील, असा इशाराही देण्यात आला आहे.