सरकारच्या कामगारविषयक धोरणांना विरोधासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये बँक कर्मचारी, अधिकारीही सहभागी झाल्याने मंगळवारी बँकांचे व्यवहार विस्कळीत झाले.

मंगळवारपासून सुरू झालेल्या या संपकर्त्यां विविध १० कामगार संघटनांमध्ये दोन बँक कर्मचारी संघटनाही सहभागी झाल्याने संबंधित बँकांच्या व्यवहारावर मंगळवारी याचा परिणाम दिसून आला. मुंबईतही अनेक बँकांच्या शाखांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती संपामुळे प्रभावित झाल्याचे दिसून आली.

बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन’ आणि ‘बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया’ या दोन संघटनांनी मंगळवारच्या कामगार बंदमध्ये सहभाग घेतला. परिणामी राज्यातील अनेक बँकांचे व्यवहार विस्कळीत झाले. मात्र स्टेट बँक आणि काही खासगी बँकांच्या कामकाजावर संपाचा परिणाम दिसून आला नाही.

‘महाराष्ट्र राज्य बँक एम्प्लॉइज फेडरेशन’ही संपात सहभागी झाल्याने मंगळवारी राज्यातील २१ सरकारी बँका, ६ खासगी बँका तसेच ४ विदेशी बँकांमधील कामकाज ठप्प झाल्याचा दावा संघटनेने केला. महाराष्ट्रातील ६,००० शाखांमधील ३०,००० कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागामुळे या ठिकाणी कोणतेही व्यवहार होऊ शकले नाहीत, अशी संघटनेचे महासचिव देवीदास तुळजापूरकर यांनी माहिती दिली. पुरेशी नोकरभरती, योग्य वेतनवाढ, पेन्शन आदी मागण्या बँक कर्मचाऱ्यांनी या आंदोलनातून पुढे रेटल्या आहेत.

कामगारांचे आंदोलन बुधवारीही सुरू राहणार असल्याने बँकांतील  कामकाजाचा सलग दुसऱ्या दिवशीही विचका होणार आहे.