देशातील वाहन विक्रीतील घसरण नव्या वर्षांच्या आरंभीही कायम राहिली आहे. देशांतर्गत प्रवासी वाहन विक्रीत जानेवारी २०२० मध्ये वार्षिक तुलनेत ६.२ घट नोंदली गेली आहे. एकूणच ठप्प पडलेली निर्मिती व्यवस्था, ग्राहकांकडून नसलेली मागणी याचा फटका वाहन क्षेत्राला बसत असून वर्षअखेरिस देऊ केलेल्या सूट-सवलतींचाही काही एक परिणाम वाहन विक्री वाढण्यावर झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाहन निर्मिती क्षेत्रातील उद्योगांची संघटना असलेल्या ‘सिआम’ने (सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स) सोमवारी जाहीर केलेल्या क्षेत्रातील जानेवारीतील प्रवासानुसार, २,६२,७१४ प्रवासी वाहने जानेवारीत विकली गेली आहेत. वर्षभरापूर्वी, याच दरम्यान २,८०,०९१ प्रवासी वाहनांची विक्री झाली होती.

प्रवासी वाहनांमध्ये कारची विक्री गेल्या महिन्यात ८.१ टक्क्य़ांनी कमी होत वर्षभरापूर्वीच्या १,७९,३२४ वरून यंदा १,६४,७९३ झाली आहे. तर सर्व गटातील मिळून वाहन विक्री १७,३९,९७५ वर येऊन ठेपली आहे. जानेवारी २०१९ मधील २०,१९,२५३ वाहनांच्या तुलनेत त्यात यंदा तब्बल १३.८३ टक्के घसरण झाली आहे.

आर्थिक वर्ष संपुष्टात येण्याचा कालावधी नजीक येत असतानाच नव्या वित्त वर्षांपासूनच्या वाहन क्षेत्रातील नियम अंमलबजावणीमुळे वाहनांच्या विक्रीवर अधिक विपरित परिणाम होण्याची भीती वाहन निर्मिती कंपन्यांमध्ये आहे. गेल्याच आठवडय़ात सादर झालेल्या अर्थसंकल्पातूनही या क्षेत्रासाठी उपयोगी अशा उपाययोजना नसल्याची खंत वाहन उद्योगाने यापूर्वीच व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्याच आठवडय़ात उत्तर भारतात झालेल्या वाहन मेळाव्यात अनेक कंपन्यांनी सहभाग घेत त्यांची नवी वाहने सादर केली.

गेल्या महिन्यात एकूण दुचाकी विक्री १६.०६ टक्क्य़ांनी कमी होत १३.४१ लाखांवर येऊन ठेपली आहे. तर या गटात मोटरसायकलची विक्री १५.१७ टक्क्य़ांनी रोडावत ८.७१ लाखांपर्यंत घसरली आहे. स्कूटर विक्री १६.२१ टक्क्य़ांनी घसरून ४.१६ लाख झाली आहे. व्यापारी वाहनांची विक्री १४ टक्क्य़ांनी कमी होत ७५,२८९ वर येऊन ठेपली.