स्वबळावर प्रवासी हवाई वाहतूक व्यवसायात सुरू करण्याचे टाटा समूहाचे स्वप्न अखेर शुक्रवारी पूर्ण झाले. ‘विस्तार’च्या नवी दिल्ली ते मुंबई सेवेच्या माध्यमातून  तब्बल सहा दशकांनंतर टाटा समूहाचा भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात पुनर्प्रवेश झाला आहे.
सिंगापूर एअरलाइन्सबरोबर सर्वाधिक हिस्सा राखणाऱ्या टाटा सन्सच्या ‘विस्तार’चे पहिले उड्डाण शुक्रवारी नवी दिल्लीहून मुंबईसाठी झाले. त्यासाठी दुपारी १२.५१ वाजता निघालेले हे विमान दुपारी २.२६ वाजता टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. स्पर्धेची चिंता राखून तुम्ही व्यवसाय करू शकत नाही, असा मंत्र देत ‘विस्तार’चे अध्यक्ष प्रसाद मेनन यांनी एअरबस कंपनीच्या ए३२०-२२० विमानाला हिरवा झेडा दाखविला.
केंद्रीय नागरी हवाई मंत्री महेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत जवळपास ३०० प्रवाशांना घेऊन निघालेल्या विमानाने ‘सलाम बालक ट्रस्ट’च्या मुलांसाठी पहिलीच हवाई सफर घडविली. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधणाऱ्या जीएमआर समूहाचे जी. एम. राव हेही या वेळी त्यांच्याबरोबर या प्रवासात होते.
टाटा समूह – सिंगापूर एअरलाइन्सला एप्रिल २०१४ मध्ये उड्डाण परवाना मिळाल्यानंतर ‘विस्तार’ने डिसेंबर २०१४ मध्ये नव्या हवाई सेवेसाठीच्या बोधचिन्ह व प्रवासी सेवांचे सादरीकरण केले होते.
कंपनी पहिल्या वर्षांत दिल्ली, मुंंबईसह पणजी, बंगळुरू, अहमदाबाद, हैदराबाद, चंदीगड, श्रीनगर, जम्मू आणि पटनासाठी पाच विमानांद्वारे विविध ८७ उड्डाणे घेईल, अशी माहिती या वेळी देण्यात आली.
वैमानिक परवाना असलेले पहिले भारतीय रतन टाटा यांनी टाटा समूहाद्वारे टाटा एअरलाइन्स सुरू केली होती. १९५० मध्ये तिचे राष्ट्रीयीकरण होऊन ती एअर इंडिया ही सरकारी हवाई प्रवासी वाहतूक कंपनी बनली.
‘विस्तार’साठी टाटा समूहाची ५१ टक्क्य़ांची, तर सिंगापूर एअरलाइन्सची ४९ टक्क्य़ांची व्यावसायिक भागीदारी आहे. टाटा समूह मलेशियाच्या एअर एशियाबरोबरही अन्य हवाई कंपनीत वाटेकरी असून तिचा व्यवसाय गेल्याच वर्षांत सुरू झाला आहे.
किंगफिशर एअरलाइन्स गेल्या वर्षभरापासून जमिनीवर असताना आणि स्पाइसजेट तूर्त आर्थिक गटांगळ्या खात असताना टाटा समूहाने दुसऱ्या हवाई कंपनीमार्फत भारतीय हवाई व्यवसायात पदार्पण केले आहे.

भारतात जागतिक दर्जाची स्वत:ची स्वयंपूर्ण हवाई प्रवासी वाहतूक सेवा असावी, असे स्वप्न स्वर्गवासी जे. आर. डी. टाटा यांनी पाहिले होते. ‘विस्तार’च्या रूपाने टाटा समूहाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
– रतन टाटा, मानद अध्यक्ष, टाटा सन्स