सुधीर जोशी

मागील आठवडय़ातील तेजीचे वातावरण सरलेल्या सोमवापर्यंत टिकून राहिले. सेन्सेक्सने ३४२ व निफ्टीने ८९ अंशांची सोमवारी उसळी घेतली होती, परंतु उर्वरित आठवडाभर बाजारावर भारत-पाकमधील तणावाचे सावट राहिले. बाजारातील हे चढ-उतार गेल्या वर्षी उत्तर कोरिया आणि अमेरिकेतील तणावाची आठवण करून देणारे होते. कारण कुठलेही असो अशा मोठय़ा चढ-उतारांमधे संयम बाळगणे महत्त्वाचे. दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी घेतलेल्या समभागांची घाईने विक्री करण्याची काहीच गरज नाही. खरे तर मोठय़ा पडझडीत चांगले समभाग जमवता आले पाहिजेत. आठवडाअखेर बाजाराने सेन्सेक्समधे १९२ अंशांची तर निफ्टीमध्ये ७२ अंशांची कमाई दर्शविली.

अमेरिका आणि उत्तर कोरियातील वाटाघाटी कुठल्याही निष्कर्षांविना समाप्त झाल्या पण भविष्याबाबत आशावाद कायम आहे. राष्ट्रीय सकल उत्पादनाचा वेग डिसेंबरअखेर तिमाहीत ६.६ टक्के नोंदला गेला जो गेल्या दोन तिमाहीत अनुक्रमे ८ टक्के व ७ टक्के होता. घसरता विकासदर आणि आटोक्यातील चलनवाढीचा दर हे रिझव्‍‌र्ह बँकेला एप्रिलमध्ये आणखी एक व्याजदर कपात करण्याची संधी देऊ शकतात.

वस्तू व सेवा कर परिषदेचा निर्माणाधीन घरांवर कर कमी करण्याचा निर्णय ग्राहकांना दिलासा देणारा आहे. परंतु नवीन करांमधून कच्च्या मालावर भरलेल्या कराची वजावट करण्याची मुभा नसल्यामुळे बांधकाम व्यवसायिकांना, घरांच्या वाढीव मागणी व्यतिरिक्त काही फायदा नाही. परिणामी बांधकाम क्षेत्राचा निर्देशांक पहिल्या दोन दिवसात २.५ टक्क्य़ांनी घसरला.

ब्रिटानिया इंडस्ट्रीजचा निफ्टीमध्ये २९ मार्चपासून समावेश होण्याच्या घोषणेमुळे कंपनीच्या समभागात तेजी आली. नित्योपयोगी उपभोग्य वस्तूंमध्ये अनेक नाममुद्रा असणारी ही कंपनी सरकारच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला पूरक धोरणांचा पुरेपूर फायदा घेऊ शकते. कंपनीच्या समभागाने गेल्या पाच वर्षांत सात पट परतावा दिला आहे. आपल्या पोर्टफोलियोमध्ये हा समभाग जमवत न्यायला हरकत नाही.

निवडणुका आणि युद्धजन्य परिस्थिती एकाच वेळी चर्चेत असताना आठवण यावी अशी कंपनी म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स! भारत इलेक्ट्रॉनिक्स (बीईएल) युद्धासाठी लागणाऱ्या विविध उपकरणांसाठी इलेक्ट्रॉनिक घटकांचे तसेच निवडणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन्सचे उत्पादन करते. कंपनीने जेएसआर डायनॅमिक्स आणि ह्य़ूज इंडियाबरोबर युद्धसामग्री, मिसाइल्स आणि हेलिकॉप्टरसाठी लागणारी संपर्कप्रणाली बनविण्यासाठी नुकतेच करार केले आहेत. डिसेंबरला संपणाऱ्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न ८ टक्क्य़ांनी व नफा ६७ टक्क्य़ांनी वाढला होता. कंपनीच्या समभागात या आठवडय़ात हालचाल दिसू लागली आहे. सध्याच्या भावात बीईएलमध्ये (बंद भाव ८५ रु.) अल्पकाळासाठी गुंतवणुकीचा विचार करता येईल.

पुढील आठवडय़ात बाजाराचे लक्ष फेब्रुवारी महिन्याच्या वाहन विक्रीचे आकडे, निवडणुकांची संभाव्य घोषणा तसेच भारत-पाकमधील भू-राजकीय घडामोडींकडे असेल. पाकविरोधी कणखर भूमिका व त्याला जगातील महत्त्वाच्या देशांचा पाठिंबा मिळवण्यात आलेले यश यामुळे मोदी सरकार पुन्हा निवडून येण्याच्या शक्यतेत मात्र वाढ झाली आहे आणि त्यामुळे बाजार आशावादी राहील.

sudhirjoshi23@gmail.com