जगातील सर्वात मोठी मद्यनिर्माता कंपनी ब्रिटनस्थित डिआजियोने भारतीय मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या उद्योगसमूहातील ‘कामधेनू’ कंपनी युनायटेड स्पिरिट्सवर अखेर ताबा मिळविला. मल्ल्या यांच्या या कंपनीतील ५३.४ टक्के हिस्सा सुमारे ११,६६६.५ कोटी रुपये (२ अब्ज अमेरिकी डॉलर) मोबदल्यात मिळविणाऱ्या डिआजियोने चालू वर्षांतील कुणाही विदेशी कंपनीकडून भारतात झालेल्या सर्वात मोठय़ा संपादन व्यवहारावर आपली मोहोर उमटविली आहे.
जॉनी वॉकर व्हिस्की, गिनीस बीअर आणि स्मिरनॉफ व्होडका या नाममुद्रांवर स्वामित्व असलेल्या डियाजियोला ताज्या ताबा व्यवहारातून, ‘किंगफिशर’ या सर्वाधिक खपाच्या बीअर ब्रॅण्डची मालकी असलेल्या ‘युनायटेड स्पिरिट्स’ची मालकी मिळेलच, पण भारतासारख्या जगातील सर्वात मोठय़ा व्हिस्की बाजारपेठेत आपले पाय भक्कम करता येणार आहेत.

या संबंधाने वाटाघाटी व करारान्वये, विजय मल्ल्या या अधिग्रहीत कंपनीच्या अध्यक्षपदी कायम राहतील. तर कर्जाच्या ओझ्याखालील किंगरफिशर एअरलाइन्ससह यूबी उद्योगसमूहातील अन्य अडचणीतील कंपन्यांनाही तारून नेण्याची संधी या व्यवहाराने मल्ल्या यांना मिळवून दिली आहे.
या सौद्याची अधिकृत घोषणा शेअर बाजारातील शुक्रवारचे व्यवहार आटोपल्यानंतर केली जाणार असली तरी, चिंतीत गुंतवणूकदारांनी त्याचे पृर्वानुमान बांधून स्वागत केले. ‘सेन्सेक्स’ घसरला असतानाही यूबी समूहातील कंपन्यांचे समभाग आज चांगलेच वधारले.
युनायटेड स्पिरिटने तर दिवसभरात १,४२५ रुपयाचा कळस गाठताना वर्षभराच्या उच्चांकाला स्पर्श केला. युनायटेड स्पिरिट रु. १,३५९.७० (+१.२२%), युनायटेड ब्रुअरिज होल्डिंग्ज    रु. १३६.०५ (+३.३४%), किंगफिशर एअरलाइन रु. १३.५३ (+४.९७%) असे यूबी समूहाची शुक्रवारी चमकदार कामगिरी राहिली.    

सर सलामत, ताज मात्र गमावले!
गेल्या ३० वर्षांत युनायटेड स्पिरिट्सने जी घोडदौड केली त्याचा गर्व निश्चितच आहे. पण आगामी सर्वोत्तम प्रगतीसाठी ‘डिआजियो’सारखा भक्कम मंच कंपनीसाठी आवश्यकच होता, अशी प्रतिक्रिया विजय मल्ल्या यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. काही दिवसांपूर्वी मल्या यांनी ‘घरातील सोने विकून (मद्य व्यवसाय) कुटुंबाची प्रतिष्ठा फुंकून कशी टाकेन?’ असा सवाल करीत डिआजियोबरोबर वाटाघाटी व व्यवहाराचा इन्कार केला होता. शुक्रवारी त्याबाबत त्यांना हटकले असता, ‘घरातील सोने विकले नाही तर त्यावर नवा साज चढविला आहे’, असे सांगत सारवासारव केली. ‘किंगफिशर एअरलाइन्स’ला कर्ज देणाऱ्या बँकांकडून ३० नोव्हेंबर ही निर्वाणीची मुदत दिली गेली असल्याची खबर नसल्याचे त्यांनी सांगितले. किंगरफिशरचे भांडवलीकरणाची जी काही गरज आहे ती युनायटेड ब्रुअरीज होल्डिंग या कंपनीकडून भागविली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सकारात्मक घटना : स्टेट बँक
पंख छाटले गेलेली मल्ल्या यांच्या समूहातील हवाई सेवा ‘किंगफिशर एअरलाइन्स’ला भरमसाट कर्ज देणाऱ्या बँकांच्या समूहांच्या अग्रणी स्टेट बँकेने ‘डिआजियो’शी मल्ल्या यांनी तडीस नेलेला ताजा व्यवहार ही सकारात्मक घटना असल्याचे म्हटले आहे. रु. ७,००० कोटींचा कर्जाचा डोंगर माथ्यावर असलेल्या किंगफिशर एअरलाइन्सला भरारी घेणारी पंख मिळवून देणारा हा मल्ल्या यांच्यासाठी दिलासा ठरेल, अशी प्रतिक्रिया स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (मिड-कॉर्पोरेट्स) एस. विश्वनाथन यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. किंगफिशरच्या व्यवस्थापनाबरोबर लवकरच बैठक आयोजिण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. किंगफिशरला सर्वाधिक १,५०० कोटी रुपयांचे कर्ज एकटय़ा स्टेट बँकेने दिले असून, चालू वर्षांत जानेवारीपासून परतफेड रखडल्याने ते अनुत्पादीत (एनपीए) म्हणून वर्ग झाले आहे. तर आधी कर्मचाऱ्यांचा संप व पुढे उड्डाण परवानाच रद्दबातल झाल्याने १ ऑक्टोबरपासून किंगफिशरचे एकही विमान उडू शकलेले नाही. दोन दिवसांपूर्वीच स्टेट बँकेचे अध्यक्ष प्रतीप चौधरी यांनी ३० नोव्हेंबर ही किंगफिशरमध्ये नव्याने भांडवल गुंतविण्याची निर्वाणीची मुदत मल्ल्या यांना दिली आहे.
ताज्या व्यवहाराचा संबंध हा माझ्या हवाई व्यवसायाशी जोडला जात असेल तर ते दुर्दैवी आहे. सध्या जे काही सुरू आहे ते युनायटेड स्पिरिट्स आणि तिच्या भागधारकांच्या सर्वोत्तम हित लक्षात घेऊन सुरू आहे आणि किंगफिशर एअरलाइन्ससाठी माझ्या हातून निश्चितच चांगलेच घडेल.
विजय मल्ल्या
यूबी समूहाचे प्रमुख