सध्याचा वाढीचा दर चीनलाही मागे टाकणारा 

तेलाची  सर्वाधिक मागणी असलेली जगातील दुसरी मोठी बाजारपेठ बनण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू असून, वाहनांसाठी इंधनाची वाढती गरज आणि घरगुती वापराच्या एलपीजी गॅसच्या मागणीत लक्षणीय वाढ पाहता विद्यमान २०१९ सालातच अमेरिकेखालोखाल परंतु चीनला मागे टाकणारे हे स्थान भारताकडून पटकावले जाण्याची शक्यता वर्तविली गेली आहे.

तेलाच्या वापराबाबत संशोधन आणि सल्लागार समूह वूड मॅकेन्झीने प्रस्तुत केलेल्या अहवालात ही शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारताचा जागतिक तेल मागणीत १४ टक्के वाटा म्हणजे प्रति दिन २,४५,००० पिंप असा वाटा आहे. दोन वर्षांपूर्वीच्या नोटाबंदी आणि त्यापाठोपाठ आलेल्या वस्तू व सेवा करासारख्या करसुधारणेतून देशाची वार्षिक सरासरी इंधन मागणी मंदावल्याचा परिणाम दिसला असला, तरी सरलेल्या २०१८ सालात त्यात पुन्हा पूर्वीसारखीच वाढ दिसून आल्याचे हा अहवाल सांगतो.

एप्रिल ते डिसेंबर २०१८ या नऊ महिन्यांत भारतात १५.७४ कोटी टन पेट्रोलियम पदार्थाचा वापर केला गेला आहे. जो आधीच्या वर्षांतील याच कालावधीच्या तुलनेत  २.५ टक्क्यांनी वाढला आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये भारताकडून एकूण २०.६३ कोटी टन इंधन जाळले गेले आहे. त्यामुळे विद्यमान २०१९ सालात हाच वृद्धी दर कायम राहिला तर सध्या तिसऱ्या स्थानावर असलेला भारत या आघाडीवर चीनलाही मागे टाकेल, असे वूड मॅकेन्झीचे भाकीत आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तेल उत्पादक ‘ओपेक’ राष्ट्रगटानेही भारतातून तेलाची मागणी सध्याच्या सरासरी अडीच लाख पिंप प्रति दिन या पातळीवरून, २०४० पर्यंत ५८ लाख पिंप प्रति दिन पातळीपर्यंत वाढेल, असे भविष्य वर्तविले आहे.

ई-वाहनांचे माफक आव्हान

*  भारतात विद्युत ऊर्जेवर चालणारी वाहने आल्यास आयात होणाऱ्या तेलावरील मदार कमी होईल, अशी शक्यतेला बिलकुल वाव नसल्याचे वूड मॅकेन्झीच्या अहवालाचा स्पष्ट दावा आहे. मुळात भारतात सध्या केवळ २,६०,००० ई-वाहने रस्त्यावर धावताना दिसत आहे, त्यातही बहुतांश दुचाकी आहेत. सरलेल्या २०१८ या आर्थिक वर्षांत केवळ १,२०० ई-मोटारी विकल्या गेल्या ज्या आधीच्या वर्षांच्या तुलनेत ४० टक्क्य़ांनी घटल्या आहेत. मात्र या वर्षांत ई-दुचाकींची विक्री १३८ टक्क्यांच्या वाढीसह ५४,८०० वर पोहोचली आहे. तरीही २०१८ सालच्या अखेपर्यंत तब्बल १८ लाख ई-मोटारी आणि २५.८ कोटी ई-बाइक्स रस्त्यावर असलेल्या चीनच्या तुलनेत भारताची कामगिरी खूपच माफक आहे. विद्युत मोटारींचा वापर मोठा असूनही चीनमध्ये तेलाची मागणी घटलेली नाही, तेथे दर १००० लोकसंख्येमागे सध्या केवळ २३ वाहने असणाऱ्या भारतात तेलाची मागणी नजीकच्या काळात तरी मंदावण्याची शक्यता दिसून येत नाही, असा मॅकेन्झीचा दावा आहे.