सध्याच्या पावसाळ्याच्या मोसमात पाण्याबाबतची जागरुकता सामान्य पातळीवर तर अधिक जोपासली जाते. मात्र कंपन्यांच्या आलिशान आणि अद्ययावत कार्यालयांमध्ये तसे चित्र नाही. कर्मचाऱ्यांसाठी कंपन्यांमध्ये मनुष्यबळ विकास विभाग असला तरी त्यांना लागणाऱ्या सुविधा मात्र कंपन्यांच्या खरेदी विभाग अथवा लेखा विभाग यांच्याच अखत्यारित असतात. त्यामुळे पाण्याच्या दर्जाला एक विभाग महत्त्व देतो तर काटकसरीचे अंगभूत कौशल्य असलेला अन्य विभागामार्फत प्रसंगी कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी पुरविण्याबाबत दुर्लक्ष होते. पाण्याच्या शुद्धतेपेक्षा ते पुरविण्याच्या साहित्यातील किंमती कंपन्यांच्या दृष्टिने अधिक महत्त्वाची ठरते, हेही यानिमित्ताने समोर आले आहे.
‘एमजीएम कॉलेज ऑफ हेल्थ सायन्स’च्या व्यवसाय व्यवस्थापनाच्या तीन विद्यार्थ्यांनी मुंबईतील निवडक कंपन्यांमध्ये याबाबत केलेल्या एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. विविध क्षेत्रातील कंपन्यांमधील दिडशेहून अधिक कर्मचाऱ्यांशी बोलून याबाबतची मते मांडण्यात आली आहेत. चैत्राली केवणे, जीनल पटेल व धनश्री हेडाऊ या विद्यार्थ्यांनी याबाबतचे एक सर्वेक्षण प्रा. प्रदिप्ता कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच केले. नरिमन पॉईंट, वांद्रे-कुर्ला संकूल, अंधेरी, मालाड येथील कंपन्यांचे कर्मचारी, मनुष्यबळ विकास, साहित्य खरेदी व पुरवठा विभाग, लेखा विभाग यांची याबाबतची मते जाणून घेण्यात आली.
सर्वेक्षणात ७३ टक्के कर्मचाऱ्यांनी पाण्यामुळे कुठलाही संसर्ग होत नाही, असे आश्चर्यकारक मत नोंदविले आहे. तर ६५ टक्के कंपन्यांमध्ये जलशुध्दीकरण यंत्र वापरले जाते तर ३५% टक्के ठिकाणी पाण्याचे जार वापरण्यात येतात. ज्या ठिकाणी जलशुध्दीकरणाची यंत्रे वापरण्यात येतात त्यातील ७५% ठिकाणी ही यंत्र वर्षांतून एकदाच साफ करण्यात येतात. संस्थेत ४ पेक्षा जास्त कर्मचारी असतील तर यंत्र दर तीन महिन्याने साफ करावे, हे यानिमित्ताने कंपनीतील विभागांना माहित नसल्याचेही निदर्शनास आले.
कंपन्यांमधील मनुष्यबळ विकास विभाग कर्मचाऱ्यांना चांगल्या दर्जाचे पाणी पुरविण्यासाठी आग्रही असतात. मात्र तशी तजवीज लेखा, प्रशासन विभागाकडून पुरविण्याबाबत आर्थिक सहकार्य होत नाही, असेही या सर्वेक्षणात निर्दशनास आले आहे.