मुंबई : नव्या पिढीची बँक म्हणून ख्याती असलेल्या येस बँकेचे प्रवर्तक राणा कपूर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे रजत मोंगा यांनी खासगी बँकेच्या वरिष्ठ समूह अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मोंगा हे बँकेचे मुख्य वित्तीय अधिकारीही राहिले आहेत.

येस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणवीत गिल यांनी या घडामोडीची माहिती गुरुवारी गुंतवणूकदार, विश्लेषकांना दिली. मोंगा हे गेल्या दोन वर्षांपासून बँकेची जबाबदारी हाताळत होते; मात्र आता त्यांनी बँकेतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे, असे गिल यांनी सांगितले.

आर्थिक अडचणीतील गृहनिर्माण प्रकल्प, गैरबँकिंग कंपन्यांना दिलेल्या कर्जामुळे गेल्या काही दिवसांपासून भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या बँकेच्या समभागाचे मूल्य सातत्याने आपटत आहे.

गिल यांनी मात्र गुंतवणूकदारांना समभाग मूल्य तसेच बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत आश्वस्त केले. गेल्या तिमाहीत ताळेबंद काहीसा आक्रसला असला तरी नव्या खात्यांची संख्या १.८० लाखाने वाढल्याचे गिल यांनी सांगितले.

समभागाची मात्र ३३ टक्क्य़ांनी मुसंडी

गेल्या चार व्यवहारांपासून सातत्याने आपटणाऱ्या येस बँकेचे समभाग मूल्य गुरुवारी उंचावताना एकाच व्यवहारात थेट ३३ टक्क्यांनी झेपावले.  बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणवीत गिल यांच्या भविष्यविषयक आश्वासक विधाने समभाग मूल्यास उपकारक ठरली. गुरुवारच्या व्यवहाराअंती समभागाचा भाव ४२.५५ रुपयांवर स्थिरावला. मंगळवारच्या व्यवहारात समभागाचे मूल्य २२.८ टक्के ३२ रुपये अशा सार्वकालिक नीचांकपदाला गडगडले होते. ऑगस्ट २०१८ मध्ये येस बँकेच्या समभागाचे मूल्य ४०४ रुपयांच्या उच्चांकावर होते. त्यानंतर संस्थापक राणा कपूर यांच्या बँकेच्या प्रमुखपदावर  फेरनियुक्तीला रिझव्‍‌र्ह बँकेने नामंजूरी दिली आणि समभागमूल्यात वाताहत सुरू झाली.