बँक आर्थिक दृष्टया अडचणीत येणार हे लक्षात आल्यानंतर सहा महिन्यात खातेदारांनी येस बँकेतून तब्बल १८ हजार कोटी रुपये काढून घेतले. मागच्यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्याच्या कालावधीत ही रक्कम येस बँकेतून काढण्यात आली आहे.

तज्ञांच्या अंदाजानुसार ऑक्टोंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत आणखी १० ते २० टक्के रक्कम काढली असण्याची शक्यता आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे. बँकेला नव्याने भांडवल उभारणी शक्य होत नाहीय तसेच एनपीए म्हणजे बुडीत कर्जाचे प्रमाण वाढत चालले होते. त्या पार्श्वभूमीवर बँक अडचणीत येणार ही शक्यता गृहित धरुन ग्राहकांनी इतकी मोठी रक्कम आधीच काढून घेतली होती.

दरम्यान रिझव्‍‌र्ह बँकेने र्निबध लादल्यामुळे अडचणीत आलेल्या ‘येस बँके’चे सहसंस्थापक राणा कपूर यांना रविवारी पहाटे सक्तवसुली महासंचालनालयाने काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये अटक केली.

कपूर यांना विशेष न्यायालयाने ११ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यांच्या निवासस्थानावरील छाप्यात विविध बनावट कंपन्यांमध्ये दोन हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केल्याचे महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले.

कपूर यांच्या वरळी येथील निवासस्थानी टाकलेल्या छाप्यात सापडलेल्या कागदपत्रांनुसार कपूर कुटुंबीयांची लंडन येथे मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, या मालमत्तेचा स्रोत मिळू न शकल्याने त्यांना शुक्रवारी व शनिवारी सक्तवसुली महासंचालनालयाच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले होते. कपूर यांनी चौकशीत सहकार्य न केल्याने अखेर त्यांना रविवारी पहाटे तीन वाजता अटक करण्यात आली. सकाळी त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. कपूर यांच्या घरात अत्यंत महागडी अशी ४४ चित्रे सापडली आहेत. यापैकी काही चित्रे राजकारणी मंडळींकडून विकत घेतल्याचेही दिसून येत आहे. याप्रकरणीही त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली, मात्र त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला, असे महासंचालनालयातील सूत्रांनी सांगितले.

बिंदू कपूर तसेच तिन्ही मुलींच्या नावे असलेल्या कंपन्यांमध्ये ६०० कोटींहून अधिक गुंतवणूक आर्थिक घोटाळ्यातील दिवाण हौसिंग फायनान्स लि. (डीएचएफएल) या कंपनीकडून आल्याचे स्पष्ट झाल्याने सक्तवसुली महासंचालनालयाकडून अधिक चौकशी सुरू होती. कपूर यांच्या मुलींच्या दिल्ली येथील निवासस्थानीही छापे टाकण्यात आले.