बाजार नियंत्रक ‘सेबी’च्या प्रोत्साहनाने राबविल्या गेलेल्या अर्थसाक्षरता उपक्रमांमुळे गुंतवणूकदार सजग होऊ लागल्याचे परिणाम दिसून येत आहेत. मागील एका वर्षांत २० लाख नवीन गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडात नवीन खाती (फोलिओ) उघडली आहेत. तर जून २०१९ अखेपर्यंत गुंतवणूकदारांची विशिष्ट संख्या (युनिक इन्व्हेस्टर नंबर) एका वर्षांत १.७६ लाख कोटींवरून १.९६ लाख कोटींवर पोहोचली असल्याचे दिसून येत आहे.

म्युच्युअल फंड उद्योगात निबंधक व हस्तांतरण संस्था म्हणून नोंदणीकृत ‘कॅम्स’ने संकलित केलेल्या माहितीनुसार गुंतवणूकदारांचा ‘पॅन’ किंवा गुंतवणूकदार १८ वर्षांखाली असल्यास पालकांच्या ‘पॅन’च्या आधारे गुंतवणूकदारांची विशिष्ट संख्या निश्चित केली जाते. त्यानुसार, म्युच्युअल फंड उद्योगांत सध्याची सक्रिय गुंतवणूकदारांची संख्या १ कोटी ९६ लाख असल्याचे निश्चित केले गेले आहे. केवळ एका वर्षांत नव्याने २० लाख गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांत गुंतवणुकीस सुरुवात करणे हे म्हणून महत्त्वपूर्ण मानले जाते. म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संघटना ‘अ‍ॅम्फी’ने राबविलेल्या ‘म्युच्युअल फंड सही है’ जाहिरात मोहिमेचा या यशात मोठा वाटा असून, डिजिटल तंत्रज्ञानामुळे म्युच्युअल फंडांची प्रत्यक्ष खरेदी-विक्री सुलभ झाल्याचा हा परिणाम आहे.

उल्लेखनीय म्हणजे म्युच्युअल फंडांच्या वितरकांना वगळून करायच्या थेट गुंतवणुकीचे प्रमाण हळूहळू वाढत असून नियोजनबद्ध अर्थात ‘एसआयपी’ गुंतवणुकीपकी ११ टक्के गुंतवणूक थेट प्रकारात होत असल्याचे दिसून आले आहे. ‘एसआयपी’ गुंतवणुकीमार्फत आलेली मालमत्ता २.८१ लाख कोटी रुपये असून थेट प्रकारातील मालमत्ता २९,७०० कोटी रुपये आहे. थेट प्रकारात सुरू असलेल्या गुंतवणुकीमध्ये एक वर्षांहून अधिक कालावधीच्या ‘एसआयपी’ फोलिओचे प्रमाण १४ टक्क्यांवर गेले आहे. हेच प्रमाण पाच वर्षांपूर्वी अवघे ५ टक्के होते. थेट प्रकारातील म्युच्युअल फंड खरेदीसाठी अनेक मोबाइल अ‍ॅप उपलब्ध असल्याने सजग गुंतवणूकदार थेट प्रकारात गुंतवणूक करण्यासाठी या सुलभ सोयीस्कर मार्गाचा वापर करीत आहेत.

भारतात १६,२०० लोकांमागे एक वितरक असे प्रमाण असून वितरण वाढविण्यासाठी, ‘अ‍ॅम्फी’ने एक कार्यदलाची स्थापना केली आहे. म्युच्युअल फंड वितरण हे उपजीविकेचे उमदे साधन म्हणून नव्या पिढीला आकर्षण वाटावे असा यामागे उद्देश आहे. त्यासाठी स्थापित आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल कपूर आणि टाटा म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक भोबे यांच्या समितीस पीडब्ल्यूसी ही सल्लागार कंपनी साहाय्य करणार आहे.

‘अ‍ॅम्फी’ने सर्व सदस्य म्युच्युअल फंडांना लिहिलेल्या पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की, म्युच्युअल फंडातील फोलिओंनी ८ कोटींची संख्या ओलांडली असली, तरी ‘अ‍ॅम्फी’कडे ८३,००० नोंदणीकृत वितरक आहेत. विमा उद्योगात २२ लाख विमा प्रतिनिधी कार्यरत आहेत. म्युच्युअल फंड संकल्पना तळागाळात पोहोचवण्यासाठी वितरकांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. गुंतवणूकदारांची वाढती संख्या पाहता येत्या ४-५ वर्षांत म्युच्युअल फंड उद्योगातील व्यवस्थापनाखालील मालमत्ता दुप्पट होण्याची संधी आहे. हे साध्य करण्यासाठी सक्रिय म्युच्युअल फंड वितरकांची मोठय़ा प्रमाणात गरज असल्याचे प्रतिपादन या पत्रात करण्यात आले आहे.

उत्तरोत्तर ‘एसआयपी’ हा परवलीचा शब्द बनला असल्याचा अनुभव नेहमीच घेत असते. विमान प्रवासासाठी सुरक्षा तपासणी करताना जेव्हा तेथील महिला सुरक्षारक्षक ‘तुमच्या फंड घराण्यात माझी एसआयपी सुरू असून मी माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या शिक्षणासाठी ती सुरू केली आहे,’ असे सांगते तेव्हा खऱ्या अर्थाने आनंद होतो आणि जबाबदारीची जाणीवदेखील होते.

राधिका गुप्ता, व्यवस्थापकीय संचालिका, एडेल्वाईज म्युच्युअल फंड

वाढत असलेली ‘नवगुंतवणूकदारां’ची संख्या हे मुलांचे शिक्षण आणि सेवानिवृत्तीसारख्या दीर्घकालीन वित्तीय ध्येयांसाठी ‘एसआयपी’ हे एक चांगले साधन असल्याचे गुंतवणूकदारांना पटू लागल्याचे द्योतक आहे.

उमा वेंकटरमण, निधी व्यवस्थापिका, आयडीबीआय म्युच्युअल फंड