चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ९८ लाखांहून अधिक करदात्यांना १.१५ लाख कोटी रुपयांहून अधिक प्राप्तिकराचा परतावा (रिफंड) जारी करण्यात आला आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने बुधवारी दिली. यामध्ये आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी (कर निर्धारण वर्ष २०२१-२२) ६५.३१ लाख करदात्यांना दिलेल्या १२,६१६.७९ कोटी रुपयांचा परतावा देखील समाविष्ट आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (सीबीडीटी) प्राप्तिकर परताव्याच्या प्रक्रियेअंतर्गत १ एप्रिल २०२१ ते ८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ९८.९० लाख करदात्यांना १,१५,९१७ कोटी रुपयांहून अधिक परतावा जारी केला गेला आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने ट्वीटद्वारे दिली. सीबीडीटीने दिलेल्या माहितीनुसार, ९७.१२ लाखांहून अधिक करदात्यांना ३६,००० कोटी रुपयांचा वैयक्तिक प्राप्तिकर परतावा मिळाला आहे. यासह कंपनी कराच्या बाबतीत १.७७ लाखांहून अधिक प्रकरणांमध्ये ७९,९१७ कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली आहे.