केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडून वितरित करण्यात आलेल्या लाभांशांतून केंद्र सरकारने ३०,३६९ कोटी रुपये मिळविले आहेत. चालू आर्थिक वर्षासाठी २२ मार्च २०२१ पर्यंत जमा महसुलाची ही आकडेवारी आहे.

सुधारित अर्थसंकल्पीय अंदाजानुसार, सरकारने सार्वजनिक उपक्रमांच्या लाभांश प्राप्तिपोटी महसूल चालू आर्थिक वर्षासाठी लक्षणीयरीत्या कमी करून तो ३४,७१७.२५ कोटी रुपये अंदाजला आहे. त्या संबंधाने मूळ अंदाज ६५,७४६.९६ कोटी रुपये असा होता. प्रत्यक्षात २२ मार्चपर्यंत लाभांशापोटी २०२०-२१ मध्ये जमा महसूल ३०,३६९ कोटी रुपयांचा आहे, असे गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग अर्थात ‘दीपम’चे सचिव तुहिन कांता पांडे यांनी ट्वीट करून स्पष्ट केले.

बीईएमएल या सरकारी कंपनीच्या खासगीकरणासंदर्भात अनेकविध इरादापत्रे प्राप्त झाली आहेत. या प्रक्रियेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होईल, असे पांडे यांनी दुसऱ्या एका ट्वीटमधून स्पष्ट केले. बीईएमएलमधील २६ टक्के हिस्सा खरेदीसाठी प्राथमिक निविदा दाखल करण्याची मुदत सरकारने २२ मार्चपर्यंत वाढवित असल्याचे गेल्या महिन्यात जाहीर केले होते. संरक्षण क्षेत्र, रेल्वे, वीजनिर्मिती आणि पायाभूत सोयीसुविधा क्षेत्रात कार्यरत या कंपनीत केंद्र सरकारचे ५४.०३ टक्के भागभांडवल आहे.