अमेरिकास्थित ३२ अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या मार्स इंकने अलीकडेच भारतीय बाजारात ‘युकानुबा’ हे पाळीव कुत्र्यांसाठी खाद्यान्नांची नाममुद्रा दाखल केली आहे. कंपनीची पेडिग्री आणि विस्कास या पेट फूड्सच्या नाममुद्रा सध्या बाजारात उपलब्ध आहेत, त्यापेक्षा उच्च प्रतीचे व महागडे असे हे नवीन ब्रॅण्ड आहे.
भारतात महागडय़ा (सुपर प्रीमियम) पेट फूड्सना अलीकडे बाजारपेठेत मोठी मागणी असून दरसाल सरासरी २० टक्के दराने त्यात अलीकडच्या वर्षांत वाढ होत आली आहे. भारतात पाळीव प्राण्यांसाठी ब्रॅण्डेड खाद्यान्नांची बाजारपेठ एक अब्ज डॉलर (सुमारे ६५०० कोटी रुपये) इतकी असण्याचा ढोबळ अंदाज असून, त्यात प्रीमियम उत्पादनांचा हिस्सा सध्या ४० टक्क्यांच्या घरात आहे, अशी माहिती मार्स इंडियाचे संचालक नितीन कुलकर्णी यांनी दिली.
मूळ प्रॉक्टर अँड गॅम्बलकडून विकसित युकानुबा या ब्रॅण्डचे मार्स इंकने जुलै २०१४ मध्ये अधिग्रहण केले आहे. युकानुबासह आयएएमस आणि नॅच्युरा या पेट फूड ब्रॅण्ड्सच्या संपादनासाठी मार्सने तब्बल ३ अब्ज डॉलरइतका मोबदला दिला आहे. मार्स इंडियाचे संचालक नितीन कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेडिग्री श्रेणीतील विविध उत्पादनांसह युकानुबाचे उत्पादन हे कंपनीच्या हैदराबादनजीक असलेल्या वार्षिक ३०,००० टन क्षमतेच्या उत्पादन सुविधेतून घेतले जाईल.

भारतात महागडय़ा व उच्च प्रतीच्या (सुपर प्रीमियम) पेट फूड्सना अलीकडे मोठी मागणी असून, सुमारे ६५०० कोटी रुपयांच्या ब्रॅ्रण्डेड उत्पादनांच्या बाजारपेठेत या प्रीमियम उत्पादनांचा हिस्सा सध्या ४० टक्क्यांचा आहे.
नितीन कुलकर्णी , संचालक मार्स इंडिया