पीटीआय, नवी दिल्ली : विमानाच्या इंधनाच्या दरात सोमवारी ५.३ टक्क्यांची वाढ केली गेल्याने त्याचे दर विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय दरात वाढ झाल्यामुळे इंधन दरात सतत वाढ सुरू आहे. चालू वर्षांतील ही सलग दहावी वाढ आहे. विमानांसाठी इंधन म्हणून वापरात येणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन फ्युएलचे (एटीएफ) दर किलोलिटरमागे ६,१८८.२५ रुपयांनी म्हणजेच ५.२९ टक्क्यांनी वाढल्याने, दिल्लीत त्याची किंमत आता किलोलिटरला १,२३,०३९.७१ रुपये झाली असल्याचे सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी दरांबाबत जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. एटीएफ दराने मार्च महिन्यात पहिल्यांदाच एक लाख रुपयांची पातळी ओलांडली होती. तेथूनही त्यात निरंतर वाढ सुरू असून ही आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. तर मुंबईमध्ये एटीएफचे दर किलोलिटरला १,२१,८४७.११ रुपयांवर पोहोचले आहे.

चालू वर्षांत ५५ टक्के वाढ

विमानाच्या इंधनाच्या दरांमध्ये सलग दहाव्यांदा वाढ झाली आहे. नवीन वर्षांत म्हणजेच २०२२ च्या सुरुवातीपासून दर पंधरवडय़ाला एटीएफच्या किमती वाढल्या आहेत. चालू वर्षांत जानेवारीपासून एटीएफचे दर किलोलिटरमागे ४९,०१७.८ म्हणजेच ५५ टक्क्यांनी वधारले आहेत. विमान कंपनीच्या चालू खर्चाच्या जवळपास ४० टक्के खर्च इंधनावर होतो. सुमारे दोन वर्षांनंतर पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या विमान कंपन्यांवरील आर्थिक ताण त्यामुळे आणखी वाढला आहे. यातून विमान प्रवास भाडे वाढविले गेल्यास प्रवाशांकडून पाठ फिरविली जाण्याची भीतीही कंपन्यांना सतावत आहे.