मुंबई : देशातील ७,००० रुपयांखालील श्रेणीतील क्रमांक एकची मोबाइल नाममुद्रा आयटेलचा देशातील सर्वाधिक नागरीकरण झालेल्या महाराष्ट्राच्या बाजारपेठेवर मोठी मदार असून, त्यानुसार या राज्यात मजबूत अस्तित्त्व विस्ताराच्या दिशेने तिचे नियोजन असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. मुख्यत: देशाच्या निमशहरी व ग्रामीण भागात दमदार स्थान असलेली ग्राहक-केंद्रित नाममुद्रा म्हणून, आयटेलने नेहमीच बाजारपेठेतील स्पर्धेचा पट बदलणाऱ्या नवकल्पना साकारून आणि स्मार्टफोन वापरकर्त्यांचा अनुभव वाढविणाऱ्या नवनव्या वैशिष्टय़ांचा उत्पादनांत समावेश केला आहे, असे मोबाइल हँडसेट निर्मात्या ट्रान्सियन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरिजित तालपात्रा यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.  राज्यात ‘आयटेल होम स्टोअर’ विशेषीकृत दालने सुरू करण्याचे नियोजन असून, सध्या विक्रेत्यांची संख्या जवळपास ११ हजारांवर तर वितरकांची संख्या शंभराच्या घरात गेली असल्याचे तालपात्रा यांनी सांगितले.