पेट्रोलियम उत्पादने, अभियांत्रिकी आणि रसायने यांसारख्या प्रमुख क्षेत्रांच्या सकारात्मक कामगिरीमुळे, १ ते १४ ऑक्टोबर दरम्यान देशाची निर्यात ४०.५ टक्क्यांनी वाढून १५.१३ अब्ज डॉलरवर पोहोचली, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार समोर आली आहे.

देशाच्या आयातीतदेखील या कालावधीत ६०.७२ टक्क्यांनी वाढ होत ती १४.८२ अब्ज डॉलर झाली आहे. त्या आधी सरलेल्या सप्टेंबरमध्येही भारताच्या वस्तू आणि सेवांची निर्यात २२.६३ टक्क्यांनी वाढून ३३.७९ अब्ज डॉलर झाली आहे. मात्र प्रमुख क्षेत्रांच्या चांगल्या व्यापार कामगिरीनंतरही, आयात-निर्यातीतील तफावत अर्थात व्यापार तूट सप्टेंबरमध्ये २२.५९ अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळी गाठणारी राहिली.

कॉफी, काजू, पेट्रोलियम उत्पादने, हातमाग, अभियांत्रिकी, रसायने, मानवनिर्मित धागा, रत्ने/दागिने, प्लास्टिक निर्यातीत वाढ झाली आहे.  एप्रिल-सप्टेंबर या सहामाहीत निर्यात ५७.५३ टक्क्यांनी वाढून १९७.८९ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्यावर्षी याच काळात १२५.६२ अब्ज डॉलरच्या वस्तू आणि सेवांची निर्यात करण्यात आली होती.

सेवा क्षेत्राला बहर

व्यावसायिक आणि व्यवस्थापन सल्ला सेवा, दूरसंचार आणि वाहतूक सेवा यासारख्या क्षेत्रातील दमदार कामगिरीमुळे २०२१-२२ मध्ये देशाच्या सेवा क्षेत्राची निर्यात २४० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता सेवा निर्यात प्रोत्साहन मंडळाने (एसईपीसी) वर्तविली आहे. वर्षाअखेर पर्यटन क्षेत्राला चालना मिळून या क्षेत्राच्या कामगिरीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत सेवा क्षेत्राच्या निर्यातीत १४ टक्क्यांनी वाढ होत, तिने ९५ अब्ज डॉलरचा टप्पा गाठला. सरकारने २०३० पर्यंत सेवा क्षेत्राच्या माध्यमातून १ लाख कोटी डॉलर निर्यातीचे लक्ष्य निश्चित केले असून ते सहज साध्य असल्याचेही ‘एसईपीसी’चे अध्यक्ष मानेक डावर म्हणाले. मात्र यासाठी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रांच्या वाढीकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.