पॅनासॉनिकची नवी व्यवसाय आखणी; नवीन सेवा क्षेत्रात शिरकाव
जवळपास पन्नास वर्षे जुना ब्रॅण्ड असणाऱ्या अँकर स्विच उत्पादनाबरोबरच वाणिज्यिक वापरासाठी लागणाऱ्या विविध विद्युत उपकरणांच्या व्यवसायावर अधिक भर देण्याचे अँकर ईलेक्ट्रीकल्सने निश्चित केले आहे. याअंतर्गत हॉटेल आदींसाठी केद्रीय पद्धतीने विद्युत रचना तसेच फॉम्र्युला वन, मेट्रोसाठी विद्युत उपकरण सुविधा पुरविण्यात येत आहे.
विद्युत स्विच निर्मितीतील आघाडीचा ब्रॅण्ड असलेली अँकर कंपनी मूळच्या जपानच्या पॅनासॉनिकने २००७ मध्ये खरेदी केली होती. यानंतर गेल्या पाच वर्षांत ती वार्षिक २२ टक्के वेगाने वाढत आहे. केवळ विद्युत स्विच बाजारपेठेत ४५ टक्क्यांहून अधिक बाजारहिस्सा असणाऱ्या अँकरचा सीएफएल दिवे, फॅन, सर्किट ब्रेकर आदी वस्तू निर्मितीमध्येही १० टक्क्यांपेक्षा कमी बाजारहिस्सा आहे.
पॅनासॉनिकने अँकर हा ब्रॅण्ड ‘प्रिमिअम’ श्रेणीत नेण्यासाठी नव्या उत्पादन क्षेत्रात शिरकाव केला आहे. यासाठी कंपनीने इटलीच्या कंपनीबरोबर करार करीत ‘एव्ह’ हे उत्पादनही सादर केले आहे. कंपनीचे सध्या या श्रेणीत ‘रोमा’ हे उत्पादन आहे. मात्र टचस्क्रिन तसेच रिमोटद्वारे विद्युत परिचनाचे नियमन होऊ शकणाऱ्या क्षेत्रातही उतरली आहे.
अँकरची प्रवर्तक पॅनासॉनिकने मे २०१२ ‘फायरप्रो’ ही बंगळुरुची कंपनी खरेदी केल्यानंतर फॉम्युला वन, दिल्ली मेट्रो या सरकारी सहभागाने विद्युत सेवा पुरवू शकणाऱ्या क्षेत्रातही अधिक कार्य करण्याचे ठरविले आहे. या माध्यमातून पॅनासॉनिकला सरकारी भागीदारीच्या विविध प्रकल्पांमध्ये सहभाग घेता येणे शक्य होणार आहे.
अँकर ईलेक्ट्रीकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे सह व्यवस्थापकीय संचालक दिनेश अगरवाल यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, दमण येथील २७,७०० चौरस मीटर जागेचा विस्तार करण्यात आला असून येथील स्विच उत्पादन निर्मिती क्षमताही वार्षिक ५० कोटी करण्यात येत आहे. यासाठी २०१३ पर्यंत १,५०० कर्मचारी भरतीही होणार आहे. यामुळे येथून उत्पादित होणारे उत्पादन येत्या दोन वर्षांत मध्य पूर्व देशांमध्ये निर्यात करता येईल.