गुजरातमधील वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्गावरील गंडेवा-एना या पट्टय़ात २७.५ किलोमीटर लांबीच्या आठ मार्गिकांची निर्मिती करण्यासाठी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडच्या निविदेवर पसंतीची मोहोर उमटली आहे.

या नवीन रस्ते प्रकल्पाचे मूल्य १,७५५ कोटी रुपयांचे आहे. अन्य औपचारिकता पूर्ण करून हा प्रकल्प कंपनीने मिळविल्यास, तिच्या विद्यमान चालू स्थितीतील कामांचे एकूण मूल्य १३,७५५ कोटी रुपयांवर जाईल. उल्लेखनीय म्हणजे याच द्रुतगती मार्गावरील पद्रा ते वडोदरा या पट्टय़ातील २३.७४० किमी लांबीच्या बांधकामाचे, २,०४३ कोटी रुपयांचे काम या कंपनीकडून सध्या सुरू आहे.

आयआरबी इन्फ्रा ही सध्या देशातील महामार्ग विकासाच्या क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. नव्या प्रकल्पासंबंधाने प्रतिक्रिया देताना आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र डी. म्हैसकर म्हणाले की, गुजरातमधील वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्गावरील आणखी एका विभागाचे काम कंपनीला मिळणे हे गेल्या दोन दशकांत कमावलेल्या या क्षेत्रातील ज्ञान अनुभव आणि अंमलबजावणीच्या क्षमतेलाच दिली गेलेली पसंतीची पावती आहे.

प्रकल्पाचे  बांधकाम ७३० दिवसांच्या विहित कालावधीत पूर्ण करावयाचे असून, त्यानंतर १५ वर्षे मुदतीसाठी या ठिकाणांहून पथकर वसुलीचे हक्क कंपनीला प्राप्त होतील.