‘व्ही’ मोटरसायकलमध्ये ऐतिहासिक जहाजाच्या सुटय़ा भागाचा वापर

मोटरसायकल निर्मितीतील देशातील आघाडीच्या बजाज ऑटोने ‘व्ही’ ही नवी मोटारसायकल सादर केली आहे. भारतीय नौदलाने मोडीत काढलेल्या आयएनएस विक्रांत या विमानवाहू नौकेतील धातूचा वापर या नव्या मोटरसायकलमध्ये करण्यात आला आहे. १५० सीसी इंजिन क्षमतेची ‘व्ही ’ही मोटरसायकल ६० हजार रुपयांपासून पुढे आहे.

नवी दिल्ली परिसरात प्रसिद्ध वाहन मेळा चालू आठवडय़ात सुरू होत असतानाच कंपनीने राजधानीत हे उत्पादन सादर करून वाहन मेळ्यातील अनुपस्थिती भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज हेही यावेळी उपस्थित होते.

‘व्ही’मध्ये मागील आसनालगतचे स्पोर्टस कौल काढता किंवा जोडता येण्यासारखे आहे. नवे स्पीडोमीटर क्लस्टरमध्ये इंधनाची पातळी दाखविणारे दुहेरी रंगाचे इंडिकेटर आहे. तसेच टेललॅम्प आकर्षक आहे.

बजाज ऑटोच्या मोटारसायकल व्यवसाय विभागाचे एरिक वास यांनी यावेळी सांगितले, मोटरसायकल क्षेत्रात ‘व्ही’च्या माध्यमातून कंपनी नवे पर्व सुरू करत आहे. भारतीय दुचाकीस्वाराला काहीतरी भरभक्कम आणि जोमदार वाहनाची आवश्यकता आहे, असे आमचे मत आहे. ‘व्ही’ मोटारसायकलची रचना आणि बांधणी खूप संशोधनानंतर करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. कंपनीच्या पल्सर या स्पोर्टसबाइक गटात ज्याप्रमाणे ग्राहकाला नवा अनुभव दिला, त्याचप्रमाणे ‘व्ही’ ही दुचाकी प्रवासी गटात चालकाला नवा अनुभव देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

ते म्हणाले, भारताची पहिली आणि सर्वात नामवंत विमानवाहू युध्दनौका असलेल्या महान आयएनएस विक्रांत युध्दनौकेच्या धातूला स्पर्श करण्याची संधी भारतीय ग्राहकांना यामाध्यमातून उपलब्ध करताना आम्हाला अभिमान वाटत आहे, असेही ते म्हणाले.

‘व्ही’ ही मोटारसायकल एबोनी ब्लॅक आणि पर्ल व्हाइट या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. येत्या मार्चपासून तिच्या विक्रीस आरंभ होईल. नव्या वाहनाची निर्मिती क्षमता महिन्याला २० हजार असेल.

  • आयएनएस विक्रांत हे विमान भारतीय नौदलात १९६१ मध्ये दाखल झाले होते.
  •  जानेवारी १९९७ मध्ये त्याचा संरक्षण दलातील वापर थांबविण्यात आला.
  • २०१३ पर्यंत हे जहाज संग्रहालयाच्या रुपात होते.
  •  नोव्हेंबर २०१४ मध्ये मोडण्यात येऊन त्यांच्या सुटय़ा भागाची लिलावाद्वारे विक्री करण्यात आली. त्यातूनच आता ‘व्ही’ ही स्वतंत्र नाममुद्रेतील नवी मोटरसायकल बजाज ऑटोने तयार केली आहे.