मंदावलेल्या आर्थिक स्थितीतही कार्यान्वयन नफ्यात १५.५३ टक्क्यांची वाढ सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत नोंदविली आहे. बँकाचा हा नफा सप्टेंबर २०१५ अखेर संपलेल्या तिमाहीत १,२२३.९४ कोटी रुपये झाला आहे.
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस. मुहनोत, आर. आत्माराम, कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता यांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे दुसऱ्या तिमाहीतील वित्तीय निष्कर्ष नुकतेच जाहीर केले.
अकल्पित तरतूद करावी लागल्याने बँकेला यंदा निव्वळ नफा मात्र कमी, १३१.४७ कोटी रुपये झाल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. आधीच्या वर्षांत याच कालावधीत नक्त नफा २८०.७३ कोटी रुपयांचा होता.
प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे बँकेच्या निव्वळ थकीत कर्जाचे प्रमाण ५.५९ टक्के, तर एकूण थकीत कर्जाचे प्रमाण ७.९८ टक्के राहिल्याचे मुहनोत म्हणाले. कृषी उद्योग व लघू उद्योगांच्या कर्ज पुरवठय़ात अनुक्रमे १३.६४ व ३.१७ टक्के वाढ होऊन ही कर्जे अनुक्रमे १६,७२२.६४ व १५,३२४.४० कोटी रुपयांची झाल्याची माहितीही या वेळी देण्यात आली.
बँकेच्या चालू व बचत ठेवींमध्ये यंदा ७.७६ टक्के वाढ झाली असून निव्वळ व्याज उत्पन्न ४.५३ टक्क्यांनी वाढले आहे. बँकेचे एकूण उत्पन्न दुसऱ्या तिमाहीत ४.८३ टक्क्यांनी वाढून ७,०२९.६१ कोटी रुपये झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Bank of maharashtra profit increased
First published on: 05-11-2015 at 00:01 IST