‘डीसीबी बँके’च्या सुविधेचा छोटय़ा व्यावसायिकांना लाभ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नव्याने लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणालीने काही अनपेक्षित लाभ बँकिंग क्षेत्रालाही उपलब्ध केले आहेत. खासगी क्षेत्रातील काही बँकांनी आपल्या व्यावसायिक-उद्योजक ग्राहकांना नव्या करप्रणालीच्या पालनासाठी मदतकारक पावले टाकताना, मासिक जीएसटी विवरणपत्रे भरण्याची सुविधा आपल्या वेबस्थळ आणि शाखांमार्फत खुली केली आहे. ही बाब बँकेला कर्जपुरवठय़ासाठी नवीन ग्राहकवर्ग तसेच वितरित कर्जदारांवर देखरेखीसाठी खूपच मदतकारक ठरत असल्याचे दिसत आहे.

मुंबईत मुख्यालय असलेल्या डीसीबी बँकेने नोंदणीकृत जीएसटी सुविधा प्रदाते तसेच करसल्लागारांच्या सेवांच्या मदतीने आपल्या २९० शाखांमध्ये जीएसटी अनुपालनासाठी विशेष कक्ष सुरू केला आहे. ही सुविधा आपल्या लघू तसेच मध्यम उद्योग क्षेत्रातील (एसएमई) ग्राहकांना खूपच उपयुक्त ठरत आहे, असे डीसीबी बँकेचे रिटेल व एसएमई बँकिंग विभागाचे अध्यक्ष प्रवीण कुट्टी यांनी सांगितले. डीसीबी बँकेचे पाच लाखांच्या घरात कर्जदार ग्राहक असून, त्यापैकी ९० टक्के ग्राहक स्वयंरोजगारातून काही ना काही उद्योग-व्यवसाय सुरू करणारे आहेत. नव्या कर-व्यवस्थेसंबंधी त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचे काम बँकेने उपलब्ध केलेल्या सुविधेतून झाले असल्याचा कुट्टी यांनी दावा केला.

डीसीबी बँकेच्या वेबस्थळावर जाऊन बँकेच्या व्यावसायिक ग्राहकांना आपल्या प्रत्येक व्यवहाराच्या एचएसएन क्रमांकासह पावत्या सुलभरीत्या बनविणे, हिशेब जुळविणे आणि अंतिमत: मासिक विवरणपत्रे विनासायास दाखल करता येतील. एका परीने बँकांचे त्यांच्याकडील रोखीचा ओघ, ताळेबंद यावर देखरेख असल्याने त्यांची कर्जपात्रता निश्चित होते. शिवाय त्या ग्राहकांबरोबर व्यवहार करणाऱ्या पुरवठादारांशी अर्थात नव्या ग्राहकवर्गाशी संधान जोडणे बँकेला शक्य होते, असे कुट्टी म्हणाले.

डीसीबी बँकेने आपला रोख कोणताही पतविषयक इतिहास नसलेल्या छोटय़ा व्यावसायिक ग्राहकांवर जाणीवपूर्वक केंद्रित केला आहे. बँकेतील व्यवसाय खाते जे अर्थात चालू खाते असते, त्यांच्यासाठी विशेष ‘डीबीएसए खाते’ सुविधा बँकेकडून दिली जाते. ज्यायोगे चालू खात्यात २५,००० रुपये मर्यादेपेक्षा अधिक शिल्लक जमा असल्यास, अधिकची रक्कम ही संलग्न बचत खात्यात स्वयंचलितरीत्या वळती केली जाते आणि रकमेवर वार्षिक चार टक्के दराने खातेदारांना लाभ मिळतो. शिवाय सुरक्षा ठेव योजना बँकेने सुरू केली असून, त्यात तीन वर्षे मुदतीच्या ठेवींवर ७.१५ टक्के वार्षिक दराने व्याज परतावा, शिवाय खातेदाराला वयाच्या ५४ व्या वर्षांपर्यंत ठेव रकमेइतकेच आयुर्विमा संरक्षणाचे कवच कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना प्रदान केले जाते.

Web Title: Bcb bank offer facility to pay monthly gst online
First published on: 05-09-2017 at 01:20 IST