वातानुकूलन यंत्र आणि वाणिज्य वापराच्या शीतकरण यंत्रातील अग्रणी कंपनी ब्लू स्टार लिमिटेडने जुलै-सप्टेंबर या चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत गेल्या वर्षांच्या तुलनेत ८० टक्क्यांच्या आसपास विक्रीचा स्तर गाठण्यास यश मिळविले असून, जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत विक्रीत करोनापूर्व पातळीपल्याड मजल गाठली जाईल, अशा आशावाद व्यक्त केला आहे.

पहिल्या तिमाहीत विक्री जवळपास निम्म्याने घटली, तर दुसऱ्या तिमाहीत तिने ८० टक्क्यांचा स्तर गाठला, त्यामुळे चौथ्या तिमाहीपर्यंत गेल्या वर्षांपेक्षा सरस विक्री दिसून येऊ शकेल, असे ब्ल्यू स्टारचे व्यवस्थापकीय संचालक बी. त्यागराजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हवेतील विषाणू व जंतू-संचाराला निष्प्रभ करणारी ‘व्हायरस डिअ‍ॅक्टिव्हिटी टेक्नॉलॉजी (व्हीडीटी)’ अशा तंत्रप्रणालीवर बेतलेली नवीन उत्पादनांची श्रेणी बाजारात आणण्याची घोषणा त्यागराजन यांनी याप्रसंगी केली. करोना आजारसाथीच्या पार्श्वभूमीवर, वातानुकूलन अनुप्रयोगासाठी उपयुक्त या तंत्रज्ञानाला विमानतळ, मॉल्स, उपाहारगृहे, सिनेमागृहे तसेच घरांमधूनही मागणी मिळण्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला.