नव्या वर्षांची सुरुवात किरकोळ वाढीने करणाऱ्या भांडवली बाजाराने आठवडय़ाच्या शेवटच्या व्यवहारात जवळपास तब्बल ४०० अंशांची उसळी घेतली.
सलग सहाव्या सत्रात वाढ नोंदविताना मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक २७,९०० नजीक पोहोचला, तर शतकी अंश वाढीमुळे निफ्टीनेही व्यवहारात ८,४००चा स्तर अनुभवला. यामुळे बाजार आता महिन्याच्या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचला आहे.
शुक्रवारी दिवसअखेर ३८०.३६ अंश वाढीसह सेन्सेक्स २७,८८७.९० वर बंद झाला. तर व्यवहारादरम्यान ८,४००ला गाठणाऱ्या निफ्टी दिवसअखेर १११.४५ अंश वाढ राखत ८,३९५.४५ वर स्थिरावला. सलग सहा व्यवहारांत सेन्सेक्सने ६७९.२९ अंश वाढ नोंदविली आहे, तर यामुळे बाजारही महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
नव्या वर्षांची सुरुवात बँक क्षेत्रावरील चर्चेच्या रूपातील परिषद, बैठकांच्या माध्यमातून होत असताना भांडवली बाजारातील या क्षेत्रातील सूचिबद्ध समभागांनीही सप्ताहअखेर मूल्यांमध्ये चमक नोंदविली.
त्यातच डिसेंबरमधील उत्पादित क्षेत्राच्या अंदाजावर समभागांची वाढीची हालचाल नोंदली गेली. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांचीही जोरदार खरेदी झाली.
सेन्सेक्समध्ये प्रमुख ३० कंपनी समभागांमध्ये अर्थातच बँक क्षेत्रातील समभाग आघाडीवर राहिले.
यात एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, यूनायटेड बँक ऑफ इंडिया, स्टेट बँकेचे समभाग वाढले.
या व्यतिरिक्त भांडवली वस्तू, माहिती तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता यांच्या समभागांमध्येही वाढ नोंदली गेली.
सेन्सेक्समधील केवळ ५ समभाग घसरले, तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये १.६७ टक्के वाढीसह भांडवली वस्तू आघाडीवर राहिल्या.
नव्या वर्षांच्या पहिल्या दिवसाच्या सुटीनंतर आशियाई बाजारातही शुक्रवारी तेजी नोंदली गेली.
सिंगापूर, हाँगकाँग, दक्षिण कोरिया येथील प्रमुख निर्देशांकांमध्ये १.०७ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. युरोपातील बाजार मात्र दुपापर्यंत घसरणीचा प्रवार नोंदवित होते.
बँक समभागांना लकाकी..
आर्थिक सुधारणांच्या आशेवर शुक्रवारी बाजाराच्या त्रिशतकी तेजीत बँक समभागांचे मोठे योगदान राहिले. सर्वच बँकाच्या समभागांनी तीन टक्क्यांपर्यंतची वाढ  नोंदवली. पुणे येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या दोन दिवसांच्या ‘ज्ञान संगम’ परिषदेच्या व्यासपीठावरून या क्षेत्रासाठीच्या घोषणांची अपेक्षा गुंतवणूकदारांकडून केली गेली. या परिषदेचा समारोप शनिवारी पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार आहे.e01