अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने फंडिग बिल मंजुर केल्याचे पडसाद भारतातील शेअर बाजारावरही उमटले आहेत. सेन्सेक्सने १७५.६८ अंशांनी झेप घेत ३६ हजार टप्पा ओलांडला. तर निफ्टीनेही ४८ अंशांनी झेप घेत ११, ०१५ चा पल्ला गाठला.

कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षावर तेजी नोंदवणाऱ्या शेअर बाजाराचा प्रवास या आठवड्यातही कायम आहे. आघाडीच्या कंपन्यांच्या लाभदायी नफ्याच्या जोरावर सेन्सेक्स व निफ्टीने सोमवारी नवे शिखर गाठले होते. मंगळवारी देखील शेअर बाजाराने विक्रमी घौडदौड करत ऐतिहासिक झेप घेतली.

अमेरिकी सिनेटने पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच लघुमुदतीच्या खर्चाचे विधेयक फेटाळल्याने सरकारी कामकाज बंद झाले होते. या शटडाऊनचे संकट टाळण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने हंगामी आर्थिक मदत विधेयक मंजुर केले. तसेच जपानमधील बँक ऑफ जपानने पॉलिसी रेटमध्ये बदल केलेले नाही. याचे देखील सकारात्मक पडसाद शेअर मार्केटवर उमटले आहेत. शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्सने ३६ हजारचा टप्पा ओलांडला. तर निफ्टीनेही पहिल्यांदाच ११ हजारचा टप्पा ओलांडला.

टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, ओएनजीसी, अॅक्सिस बँक, कोल इंडिया यांचे शेअर वधारले आहेत. तर एशियन पेंट्स, हिंदूस्तान युनिलिव्हर लिमिटेड, टाटा मोटर्स या शेअरचे दर घसरले आहेत.