केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना भारताच्या इतिहासातील सर्वात मोठं भाषण केलं आहे. निर्मला सीतारामन यांनी ११ वाजता अर्थसंकल्प मांडत भाषणाला सुरुवात केली होती. हे भाषण जळपास तीन तास सुरु होतं. एक वाजून ४० मिनिटांनी निर्मला सीतारामन यांनी आपलं भाषण थांबवलं. निर्मला सीतारामन यांनी दोन तास ४० मिनिटं भाषण करत नवा रेकॉर्ड केला आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा दोन पानं बाकी होती तेव्हा निर्मला सीतारामन यांनी आपलं भाषण थोडक्यात संपवण्याचा निर्णय घेतला. सलग १६० मिनिटं बोलल्यानंतर निर्मला सीतारामन यांची तब्येत बिघडल्याचं दिसत होतं. वारंवार त्या कपाळावरील घाम पुसत होत्या यावेळी इतर खासदार त्यांच्याकडे जाऊन विचारपूस करताना दिसत होते. काही वेळाने निर्मला सीतारामन यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची परवानगी घेत भाषण उर्वरित दोन पानं वाचली असल्याचं गृहित धरत भाषण संपवलं. २०१९ मध्येही निर्मला सीतारामन यांनी दोन तास १७ मिनिटांचं मॅरेथॉन भाषण करत जसवंत सिंग यांचा दोन तास १५ मिनिटांचा रेकॉर्ड तोडला होता.

शब्दांचा रेकॉर्ड
शब्दांबद्दल बोलायचं गेल्या, १९९१ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी सर्वात मोठं १८ हजार ६५० शब्दांचं अर्थसंकल्पीय भाषण केलं होतं. भाजपा दिवंगत नेते अरुण जेटली यांनी २०१८ मध्ये १८ हजार ६०४ शब्दांचं भाषण करत दुसऱ्या क्रमांकाचा रेकॉर्ड केला होता. विशेष म्हणजे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरही अरुण जेटली यांचंच नाव आहे. सर्वात छोट्या भाषणाबद्दल बोलायचं गेल्यास, १९७७ मध्ये अंतरिम अर्थसंकल्प मांडताना एच एम पटेल यांनी ८०० शब्दांचं भाषण केलं होतं.