महिलांसाठी तयार वस्त्रप्रावरणाच्या लोकप्रिय फ्युजन बीट्स नाममुद्रेअंतर्गत नवीन श्रेणीच्या प्रस्तुतीसह वस्त्रनिर्मात्या ‘क्रिएटिव्ह लाइफस्टाइल’ला निर्यातीसह देशांतर्गत विक्रीत आगामी दोन वर्षांत दुपटीने वाढीची अपेक्षा आहे. २०१४-१५ आर्थिक वर्षांअखेर सुमारे १२५० कोटी रुपयांचा कंपनीचे एकूण महसूल मार्च २०१७ अखेर २५०० कोटी रुपयांवर जाणे अपेक्षित आहे, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राहुल मेहता यांनी सांगितले.
ई-व्यापाराच्या वाढत्या प्रभावाने देशांतर्गत विक्री मंदावली, तर जागतिक बाजारपेठेतील नरमाईने निर्यातही स्थिरावली अशा बिकट परिस्थितीत वस्त्रोद्योग असतानाही, २००७ साली प्रस्तुत झालेल्या फ्युजन बीट ब्रॅण्डने निरंतर ३०-३५ टक्के दराने प्रगती साधली आहे, असे मेहता यांनी स्पष्ट केले.
त्यांचे नवीन स्प्रिंग-समर २०१५ कलेक्शनची रचना ही पाश्चिमात्य आणि पारंपरिक भारतीय पेहरावाचे अजोड संमिश्रण असून, ते खास १८ ते २५ वयोगटातील आधुनिक, कामकरी महिलांना लक्ष्य करून प्रस्तुत करण्यात आले आहे.
कंपनीने अलीकडे ऑनलाइन विक्रीच्या क्षेत्रातही पाऊल टाकले असून, फ्युजन बीट या नावाने स्वमालकीच्या विशेष विक्री दालनांची सध्या ९ असलेली संख्या तीन वर्षांत ५० वर नेण्याचे कंपनीचे नियोजन आहे. कंपनीची महिलांसाठी तयार वस्त्रांची १०९ डिग्री एफ या नावाने दुसरी नाममुद्राही बाजारात प्रचलित असून, त्याच नावाने सध्या ३६ विशेष विक्री दालने देशभरात कार्यरत आहेत.
या दोन्ही तयार वस्त्रांच्या विक्री दालनांची संख्या तीन वर्षांत १५० वर नेण्याचे नियोजन आहे. यापैकी मुंबई व महाराष्ट्रासह पश्चिम भारतात सर्वाधिक नवीन दालने सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.