आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही सत्रांपासून सातत्याने घसरत असलेल्या खनिज तेल दरांनी सोमवारी कमालीची उतरंड अनुभवली. ब्रेन्ट क्रूड प्रति पिंप एकाच व्यवहारात २.१० डॉलरने कमी होऊन ३६.०९ वर येऊन ठेपले. काळ्या सोन्याचा हा गेल्या ११ वर्षांतील तळ राहिला.
अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हमार्फत नव्या वर्षांत पाव टक्का व्याजदरोढ केल्याचा निर्णय जाहीर झाल्यापासून खनिज तेलाचे दर अधिक प्रमाणात उतरत आहेत. सोमवारच्या मोठय़ा घसरणीमुळे लंडनच्या बाजारात तेल दर आता जुलै २००४ च्या समकक्ष येऊन पोहोचले आहेत. तर अमेरिकेच्या टेक्सास बाजारात तेलाचा दर प्रति पिंप ३४ डॉलरखाली उतरला आहे.
जागतिक स्तरावर घसरत असलेल्या कच्च्या तेलाच्या दरांमुळे प्रमुख भांडवली बाजारातही पडझड नोंदली जात आहे. अमेरिकेनेही आपली तेल सज्जता अधिक भक्कम केली असताना प्रमुख तेल उत्पादक देशांमध्ये तेल निर्यातीची चिंता अधिक तीव्र स्वरुप धारण करत आहे.