जोखीमविषयक ठळक ‘अस्वीकृती’ बंधनकारक

मुंबई : क्रिप्टोकरन्सी अर्थात आभासी चलनातील गुंतवणुकीवर भरघोस परताव्याच्या भ्रामक दाव्यांच्या जाहिरातींना चाप बसणार आहे. जाहिरात क्षेत्राची नियामक संस्था अ‍ॅडव्हर्टायिझग स्टँडर्डस कौन्सिल ऑफ इंडियाच्या (आस्की) फर्मानानुसार, येत्या १ एप्रिलपासून आभासी चलन आणि ‘नॉन फंजिबल टोकन’ अर्थात ‘एनएफटी’च्या जाहिरातींसह ‘कायदेशीर मान्यता नसलेली आणि उच्च जोखीम असलेली गुंतवणूक’ असा सुस्पष्ट उल्लेख असलेल्या अस्वीकृती नमूद करणे जाहिरातदारांना बंधनकारक ठरेल.  

क्रिप्टोमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून नुकसान झाल्यास ते कायदेशीर नसल्याने त्यासंबंधाने कोणतीही कायदेशीर मदतही घेता येणार नाही. क्रिप्टोकरन्सी आणि ‘एनएफटी’ यांसारख्या सर्व प्रकारच्या आभासी डिजिटल मालमत्तांची जाहिरात करताना त्यावर ठळकपणे आणि न चुकता ‘अतिजोखीमयुक्त गुंतवणूक’ म्हणून अस्वीकृती (डिस्क्लेमर) देणे आता बंधनकारक असेल. या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या, सरकार आणि नियामकांशी सल्लामसलत केल्यानंतर, ‘आस्की’कडून मार्गदर्शक तत्त्वांची घोषणा करण्यात आली आहे. अतिजोखीमयुक्त उत्पादने आणि सेवांच्या जाहिरातींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि सामान्य ग्राहकांना गुंतवणुकीतील जोखमीची कल्पना नसल्याने मोठय़ा आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते आहे.

डिजिटल मालमत्ता आणि सेवांच्या जाहिरातींसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता आहे. कारण तो गुंतवणुकीचा नवीन आणि उदयोन्मुख मार्ग आहे. म्हणूनच, ग्राहकांना जोखमींची जाणीव करून देणे आणि त्यांना सावधगिरीने पुढे जाण्यास सांगणे आवश्यक आहे, असे ‘आस्की’चे अध्यक्ष सुभाष कामथ यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून अजूनही आभासी चलनाला कायदेशीर मान्यता मिळालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील क्रिप्टोमधील वाढत्या गुंतवणुकीबाबत चिंता व्यक्त केली होती. क्रिप्टो मालमत्तांमध्ये भारतीयांनी ६ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली असल्याचे अंदाजले गेले आहे. आभासी मालमत्तांमधील व्यवहारातील नियमनाबाबत आणि राष्ट्रीय धोरण निश्चित करण्यासाठी केंद्र सरकार सध्या सर्व संबंधित घटकांशी आणि तज्ज्ञांशी चर्चा करत आहे. आभासी मालमत्तेतील व्यवहारांमध्ये अभूतपूर्व वाढ झाल्याचे सांगून, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात, आभासी डिजिटल मालमत्तेला करकक्षेत आणत असल्याची घोषणा केली होती.

गुंतवणूकदार संख्या १० कोटींवर

सध्या देशात आभासी चलनामध्ये गुंतवणूक करणारम्य़ांची संख्या १० कोटी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष असे किती गुंतवणूकदार आहेत हे बघण्याचे काम सरकारी पातळीवर सुरू आहे.