जपानी बाजारपेठेत जेनेरिक औषधनिर्मितीसाठी फुजीफिल्म कॉर्पोरेशनसह संयुक्त भागीदारीत व्यवसाय सुरू करण्याच्या प्रस्तावित योजना गुंडाळण्यात आली असल्याचे सोमवारी आघाडीची औषधी कंपनी डॉ रेड्डीज लॅबॉरेटरीजने घोषित केले.
आपले भागीदार फुजीफिल्म्सने आपल्या औषध व्यवसायविषयक दीघरेद्देशी धोरणाचा फेरविचार केल्याने दुर्दैवाने ही स्वस्त जेनेरिक औषधांच्या विकास व निर्मितीसाठी असलेली भागीदारी फलद्रूप होऊ शकलेली नाही, असे डॉ. रेड्डीजचे अध्यक्ष आणि मुख्याधिकारी जी व्ही प्रसाद यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले. तथापि जगभरातील रुग्णांसाठी किफायती औषधांच्या नावीन्यपूर्ण प्रस्तुतीचे हे स्वप्न साकारता येत नसले तरी भविष्यात जपानी बाजारपेठेत प्रवेशाचा आपला निर्धार कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
उभय कंपन्यांमध्ये २८ जुलै २०११ रोजी ५१ : ४९ टक्क्यांच्या संयुक्त भागीदारीविषयक सामंजस्याचा करार करण्यात आला होता. यात फुजीफिल्म्सचा वाटा ५१ टक्के तर डॉ. रेड्डीजचा ४९ टक्के सहभाग निश्चित करण्यात आला होता. तथापि जेनेरिकव्यतिरिक्त औषधी उद्योगातील एपीआयचा विकास व निर्मिती तसेच अन्य व्यवसायात दोन्ही कंपन्यांमध्ये परस्पर सहकार्य व भागीदारीच्या शक्यता कायम असल्याचे फुजीफिल्म्सच्या औषधी विभागाचे महाव्यवस्थापक ताकातोशी इशिकावा यांनीही स्पष्ट केले आहे. डॉ. रेड्डीजसोबत अन्य क्षेत्रात सहकार्य सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले.