वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सरलेल्या मे महिन्यात वस्तू आणि सेवांसाठी वाढलेली मागणी आणि उद्योगांकडून झालेला उत्पादन विस्तार यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेने पुन्हा एकदा करोनापूर्व पातळीच्या दिशेने वाटचाल केली असल्याचे सोमवारी ब्लूमबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केले आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे मापन करणाऱ्या आठ निर्देशांकांपैकी पाच निर्देशांकांत सुधारणा दिसून आली आहे. गेल्या वर्षी जुलैनंतर प्रथमच या निर्देशांकांची वरच्या दिशेने वाटचाल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ब्लूमबर्गच्या या अहवालात, भारतातील सेवा आणि निर्मिती व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणाऱ्या ‘पीएमआय’ निर्देशांक, नवीन सेवा मागणी निर्देशांक, निर्यात, कर्ज मागणी, उत्पादन निर्देशांक असा विविध निर्देशांकांचा यात आढावा घेण्यात आला आहे.

मे महिन्यात निर्मिती क्षेत्राबरोबरच सेवा क्षेत्राने वाढ दर्शवत गेल्या ११ वर्षांतील उच्चांकी पातळी गाठणारी कामगिरी केली आहे. महागाईचा पारा वाढता असला तरी, नव्याने आलेला कामांचा ओघ व मागणीपूरक अनुकूलतेमुळे एकंदर सेवा क्षेत्राने उच्चांकी सक्रियता साधली आहे. भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणाऱ्या ‘एस अ‍ॅण्ड पी ग्लोबल इंडिया सव्‍‌र्हिसेस पीएमआय’ निर्देशांक मे महिन्यात ५८.९ गुणांवर नोंदला गेला. याचबरोबर मे महिन्यात देशातून झालेल्या निर्यातीत गत वर्षांच्या तुलनेत २१.१ टक्क्यांची वाढ होऊन, ती २३.७ अब्ज डॉलरच्या पातळीवर पोहोचली आहे.

महागाईची चिंता कायम

 रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवर पुरवठय़ाच्या बाजूने व्यत्यय निर्माण झाल्याने वस्तू आणि सेवा महागल्या आहेत. यामुळे भविष्यात महागाईची चिंता कायम राहण्याची शक्यता आहे. अन्नधान्याच्या वाढत्या किमती, इंधनाचे चढे दर, वाढता वेतन खर्च  आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे जागतिक पातळीवर मध्यवर्ती बँकांनी विकासापासून महागाई नियंत्रण असा भूमिका बदल केला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेनेदेखील गेल्या दोन महिन्यांत दरात ०.९० टक्क्यांची वाढ केली आहे.