सणांमध्ये किमतवाढीची धास्ती नसल्याचा निर्वाळा

ऐन सणांच्या तोंडावर झालेल्या करवाढीमुळे किमती वाढल्या तरी हरकत नाही, अशी भूमिका घेत सराफांनी राज्य सरकारच्या ताजा करवाढीचे समर्थन केले. सोने तसेच चांदीचे दर सध्या तुलनेत कमी असल्याने करवाढीनंतरही त्यात अधिक वाढ होणार नाही, असा विश्वासही यामागे आहे.
महाराष्ट्रात दुष्काळाचा सामना करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या निधीकरिता शासनाने सोने तसेच हिऱ्यांच्या दागिन्यांवर १.२० टक्क्यांपर्यंत वाढीव कर लावला आहे.  इंधनाबरोबरच मौल्यवान धातूवरील ही करवाढ १ ऑक्टोबरपासूनच लागू झाली आहे. मौल्यवान धातू खरेदीसाठीचा महत्त्वाचा मुहूर्त येत्या २२ ऑक्टोबरच्या दसऱ्याच्या रूपात अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे.
वाढीव करामुळे मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्या तरी सध्या किमान स्तरावर असलेल्या भावात अधिक फरक पडणार नाही, असे एका सराफा व्यावसायिकाने ‘लोकसत्ता’ला सांगितले. गेल्या अनेक महिन्यांपासून सोन्याचे तोळ्याचे दर २६ हजार रुपयांच्या तर चांदीचा किलोचा भाव ३५ हजार रुपयांच्या आसपासच आहे, याकडेही या व्यापाऱ्याने लक्ष वेधले.
राज्यात उद्भवलेल्या सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत सरकारच्या उत्पन्नवाढीला हरकत घेण्याचा प्रश्नच नाही, अशी भूमिका ‘ऑल इंडिया जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन’ (एआयजीजेटीएफ)ने घेतली आहे. दागिने क्षेत्रातील व्यापाऱ्यांचे राज्यातील शेतकऱ्यांप्रती गेल्या अनेक वर्षांपासून चांगले संबंध राहिल्याचे नमूद करत त्यांच्या हितासाठीच राज्याने निर्णय घेतल्याचे फेडरेशनचे अध्यक्ष अशोक मिनावाला यांनी म्हटले आहे.
राज्य शासनाने सोने, चांदी तसेच हिऱ्यांच्या दागिन्यांवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) आधीच्या एक टक्क्यावरून १.२० टक्के केला आहे. या कराची अंमलबजावणी १ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागूही झाली आहे. याचबरोबर पेट्रोल, डिझेल, सिगारेट, मद्य यांवरील करही वाढविण्यात आला आहे.