ऑगस्टमध्ये जीएसएम मोबाइलधारकांच्या संख्येत वाढ झाली असून सर्वाधिक ग्राहकसंख्येसह भारती एअरटेल वरच्या स्थानावर कायम आहे. मुख्य स्पर्धक व्होडाफोनचे दुसरे स्थान कायम असले तरी तिच्या मोबाइलधारक संख्येत मात्र तब्बल ८५ हजारांची घट झाली आहे. आदित्य बिर्ला समूहाची आयडिया सेल्युलर ७.५२ लाख वाढीसह, १२.६० लाख ग्राहकसंख्येसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया यांचा अनुक्रमे २८.५०, २२.८८ व १८.६९ टक्के बाजारहिस्सा आहे.
जीएसएम तंत्रज्ञानावर सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांची संघटना ‘सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया’ने (सीओएआय) च्या ताज्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात एकूण १७.८ लाख नव्या मोबाइलधारकांची भर पडली असून यामुळे एकूण जीएसएमधारक ६७.४४ कोटींपुढे गेले आहेत. तत्पूर्वी जुलै महिन्यात ते ६७.२६ कोटी होते. एअरटेल, आयडियासह एअरसेल, व्हिडीओकॉननेही यंदा ग्राहकसंख्येत भर राखली आहे. एअरसेलने सर्वाधिक ८.७६ लाख नवे ग्राहक नोंदवीत एकूण ६.२६ कोटी मोबाइलधारक जोडले आहेत. व्होडाफोनसह यूनिनॉर, एमटीएनएलच्या ग्राहकसंख्येतही यंदा घट झाली आहे. मुंबईसारख्या काही परिमंडळांतील सेवा बंद करावी लागलेल्या युनिनॉरचे गेल्या महिन्यात तब्बल ५ लाखांनी मोबाइलधारक कमी होऊन ती संख्या ३.२२ कोटींवर आली आहे.
रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी समूहातील आर-कॉम ही कंपनी एकूण ग्राहकसंख्येत पहिल्या तीनात असली तरी ती जीएसएमबरोबरच सीडीएमए तंत्रज्ञानावरील मोबाइल सेवाही ती पुरविते. अशीच सेवा देणाऱ्या टाटा टेलिसव्‍‌र्हिसेसचेही ‘सीओएआय’ संघटनेत अस्तित्व नसल्याने त्यांचे आकडे देण्यात आलेले नाहीत.