कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) जुलै महिन्यात १४.६५ लाख नवीन सदस्य जोडून घेतल्याचे सोमवारी स्पष्ट केले. जूनमधील ११.१६ लाख नवीन सदस्यांच्या तुलनेत, त्यात ३१.२८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

ईपीएफओने प्रसृत केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या चार महिन्यांपासून सदस्य संख्येत वाढीचा कल दिसून येत आहे. देशातील औपचारिक क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढत असल्याचे यावरून स्पष्ट होते.

एप्रिलच्या मध्यापासून करोनाची दुसरी लाट आल्यानंतर अनेक राज्यांना निर्बंध लागू करावे लागले. याचा परिणाम रोजगारावरदेखील दिसून आला. एप्रिलमध्ये ८.९ लाख, तर मे महिन्यात ६.८७ लाख नवीन सदस्यांची नोंदणी झाली होती. करोनामुळे उद्योगचक्र मंदावल्याने नवीन रोजगाराच्या संधी कमी झाल्या होत्या, मात्र गेल्या काही महिन्यांपासून रोजगाराबाबत आशादायक चित्र दिसत आहे.