नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि  खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेने दोन कोटींहून कमी रकमेच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढीची घोषणा केली आहे.

बँकिंग क्षेत्रातील अग्रणी स्टेट बँकेने ठेवींवरील व्याजदराची फेररचना करताना, दोन कोटींहून कमी रकमेच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात ०.१५ टक्क्यांची वाढ केली आहे. नवीन दर शनिवार, १३ ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहेत. स्टेट बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ५ ते १० वर्षे आणि ३ ते ५ वर्षे मुदतीच्या मुदत ठेवींवर आता अनुक्रमे ५.६५ टक्के आणि ५.६० टक्के दराने व्याज मिळणार आहे. ज्यावर आधी अनुक्रमे ५.५० आणि ५.४५ टक्के दराने व्याज दिले जात होते. तसेच २ ते ३ वर्षे मुदतीच्या मोठय़ा ठेवींवर आता ५.३५ टक्क्यांऐवजी ५.५० टक्के दराने व्याज मिळेल आणि १ ते २ वर्ष कालावधीच्या ठेवींवर ५.४५ टक्के दराने व्याज मिळणार आहे. तर दुसरी सरकारी बँक असलेल्या सेंट्रल बँकेच्या ७ दिवसांपासून ते ५५५ दिवसांच्या विविध मुदत ठेवींवर आता २.७५ टक्के ते ५.५५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे. व्याजाचे सुधारित दर नवीन मुदत ठेवी आणि मुदतपूर्ती झालेल्या ठेवींच्या नूतनीकरणासाठी लागू असतील.

खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेने केवळ १७ ते १८ महिने मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात थेट ०.४५ टक्क्यांची वाढ केली असून दोन कोटींहून कमी रकमेच्या ठेवींवर आता ५.६० टक्क्यांऐवजी ६.०५ टक्के व्याज देय असेल.

चालू महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीने वाढत्या महागाईला आवर घालण्यासाठी रेपो दरात ५० आधार बिंदूच्या वाढीची घोषणा केल्यांनतर बँकांकडून आता ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्यात येत आहे. आणखी इतर बँकांकडून येत्या काळात ठेवींवरील व्याजदरात वाढीची शक्यता आहे.

ठेवींवरील लाभात तीव्र वाढ शक्य

बँकांकडून कर्जाच्या मागणीतील वाढ लक्षात घेता, येत्या काही महिन्यांत बँकांना त्यासाठी निधी मिळविण्यासाठी ठेवींवरील व्याजदरात झपाटय़ाने आणि आकर्षक वाढ करणे भाग पडेल, असा आघाडीची पतमानांकन संस्था ‘इक्रा रेटिंग्स’च्या अहवालाचा निष्कर्ष आहे. विशेषत: जुलैनंतर बडय़ा कर्जदारांकडून बँकांकडून कर्जाची मागणी लक्षणीय वाढत असते. या काळात बँकांमधील तरलतादेखील कमी होत असते. परिणामी, बँकांना तुलनेने स्वस्त निधी मिळवून देणाऱ्या सामान्य ग्राहकांकडून ठेवी अधिकाधिक मिळायच्या तर त्यांना व्याजदरात जलदगतीने वाढ करणेही भाग ठरेल, असे ‘इक्रा’च्या अहवालाचे म्हणणे आहे.