सेन्सेक्सचा २८ हजाराचा सप्ताहारंभ सत्रस्तर

सलग दुसऱ्या सत्रात घसरताना प्रमुख निर्देशांकांनी सप्ताहारंभीच्या व्यवहारातील तेजीही संपुष्टात आणली. दिवसअखेर ८९.८४ अंश घसरणीसह सेन्सेक्स २७,७४६.६६ वर तर ३२.७० अंश नुकसानासह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,५०८.७० वर स्थिरावला.
मुंबई निर्देशांकाने नव्या आठवडय़ाची सुरुवात करतानाच तेजीमुळे २८ हजाराचा टप्पा पार केला. २८,०१३.५० हा त्याचा सत्राचा सर्वोच्च स्तर राहिला. तर निफ्टीचा सत्रातील ८,५८३ हा व्यवहारातील सर्वोच्च स्तर सोमवारच्या सुरुवातीच्या तसेच मध्याच्या व्यवहारा दरम्यान नोंदला गेला.
आशियाई बाजारातील तेजीच्या जोरावर सुरू असलेला येथील बाजाराचा चढा प्रवास दुपारच्या सत्रानंतर युरोपीय बाजारातील घसरणीपोटी शुक्रवारच्या तुलनेत नकारात्मक स्थितीत रुपांतरित झाला. सुरुवातीच्या तेजीमुळे सेन्सेक्समधील रिलायन्सचा समभागही १,०३९ या वरच्या टप्प्यावर गेला होता.
तर बाजार व्यवहारानंतर पहिल्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष जाहीर करणाऱ्या हिंदुस्थान यूनिलिव्हरचे समभागमूल्य सत्रअखेर २ टक्क्य़ांनी घसरले. ४जी तसेच ३जीचे डेटा पॅकचे दर ६७ टक्क्य़ांपर्यंत कमी करण्याच्या घोषणेने आयडिया सेल्युलरचा समभाग ६.५२ टक्क्य़ांनी खाली आला.
सेन्सेक्समधील ३० पैकी २० कंपनी समभागांचे मूल्य घसरले. तर १० समभाग व्यवहारातील तेजीनंतरही दिवसअखेरही वाढते राहिले. तर बजाज ऑटो, बँक, इन्फोसिसचे मूल्य मात्र २.५१ टक्क्य़ांपर्यंत वाढले.eco01
रुपया कमकुवत
डॉलरच्या तुलनेत रुपया सप्ताहारंभी १३ पैशांनी घसरत ६७.२० पर्यंत आला. सेन्सेक्स, निफ्टीप्रमाणेच सत्राच्या ६७.०५ या वरच्या टप्प्यावर असलेले स्थानिक चलन व्यवहारा दरम्यान ६७.२१ पर्यंत रोडावले. अखेर त्यात ०.१९ टक्के घट झाली. रिझव्‍‌र्ह बँक गव्हर्नर राजन यांचे रुपयाबाबतचे मत परकी चलन मंचावर चर्चिले गेले.