सार्वजनिक क्षेत्रातील विविध बँकांमध्ये रिक्त असलेल्या कार्यकारी संचालकांची पदे भरण्यासाठी मुलाखती सरकारनियुक्त निवड गटाकडून गुरुवारपासून सुरू होत आहेत. वेगवेगळ्या बँकांमधील १४ कार्यकारी संचालकपदांसाठी ३५ उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत.
या उमेदवारांना प्रत्येकी दोन सदस्य असलेल्या तीन उपसमित्यांसमोर जावे लागणार आहे. याव्यतिरिक्त वित्त सचिव, अतिरिक्त वित्त सचिव तसेच रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर हेदेखील या उमेदवारांची चाचणी घेणार आहेत. नियुक्तीचा अंतिम अधिकार मात्र रिझव्‍‌र्ह बँकेकडे असणार आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या अध्यक्षतेखालील याबाबतच्या समितीने यापूर्वी आठ सार्वजनिक बँकांच्या प्रमुखपदासाठी १९ कार्यकारी संचालकपदांच्या मुलाखती घेतल्या आहेत. देशात पहिल्यांदाच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तसेच कार्यकारी संचालक अशी भिन्न पदरचना करण्यात येत आहे. नवीन आर्थिक वर्षांपासून सरकारी बँकांमध्ये अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अशी पदे एकच नव्हे तर दोन स्वतंत्र व्यक्तींकडे असतील.