मुंबई : डिजिटल वित्तीय सेवा क्षेत्रातील ‘पेटीएम’ने पुढील सोमवारपासून प्रस्तावित भारतीय भांडवली बाजाराच्या सर्वात मोठ्या प्रारंभिक समभाग विक्रीपूर्वी टॉकरॉक, सीपीपीआयबी, बिर्ला म्युच्युअल फंड, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन यासह इतर आघाडीच्या सुकाणू गुंतवणूकदारांकडून ८,२३५ कोटींचा निधी उभारला आहे. सुकाणू गुंतवणूकदारांकडून आलेली मागणी पुढे प्रत्यक्ष भागविक्रीला मिळू शकणाऱ्या प्रतिसादाची चुणूक देत असते.

‘पेटीएम’ची प्रवर्तक ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’कडून प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून विक्रमी १८,३०० कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येणार आहेत. आजवर अशा माध्यमातून भारतात कोणाही कंपनीकडून होणारी सर्वात मोठी निधी उभारणी आहे. सुकाणू गुंतवणूकदारांमार्फत त्यापैकी ४५ टक्के निधी मिळविण्यास कंपनी यशस्वी ठरली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ७४ सुकाणू गुंतवणूकदारांकडून या फेरीला १० पट अधिक भरणा करणारा प्रतिसाद मिळाला. यापैकी ब्लॅकरॉकने १,०४५ कोटी रुपये, सीपीपीआयबी आणि जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनने अनुक्रमे ९३८ कोटी आणि ५३३ कोटी रुपये गुंतवले आहेत. याशिवाय परदेशातील आघाडीचे पेन्शन फंड, सुपरअ‍ॅन्युएशन फंड तसेच सॉव्हरिन वेल्थ फंडांनी तसेच युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास आणि केंब्रिज विद्यापीठाने गुंतवणूकदार म्हणून सहभाग घेतला.

सोमवारपासून महाविक्री

पेटीएमची प्रारंभिक समभाग विक्री येत्या सोमवारपासून म्हणजेच ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी गुंतवणूकदारांना १० नोव्हेंबरपर्यंत बोली लावता येईल. कंपनीने प्रति समभाग २,०८० ते २,१५० रुपयांचा किंमत पट्टा निश्चिात केला आहे. वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान सहा आणि त्यानंतर सहाच्या पटीत समभागांसाठी बोली लावून, कंपनीच्या या भागविक्रीत सहभागी होता येईल.

बिटकॉइन व्यवहारास उत्सुक

देशात बिटकॉइन व्यवहारांना कायदेशीर मान्यता मिळाल्यास ‘पेटीएम’च्या मंचावरून बिटकॉइन खरेदी-विक्रीचा पर्याय गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिला जाऊ  शकतो, असे पेटीएमचे मुख्य वित्तीय अधिकारी मधुर देवरा यांनी स्पष्ट केले.

भारतात सध्या बिटकॉइनच्या खरेदी-विक्रीवर बंदी नसली तरी त्याला पूर्णपणे कायदेशीर मान्यता मिळालेली नाही. रिझर्व्ह बँकेने देशात आभासी चलनाच्या (क्रिप्टोकरन्सी) खरेदी विक्रीवर बंदी घातली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मार्च २०२० मध्ये हा आदेश रद्दबातल केला.