देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असलेल्या ‘भारतीय आयुर्विमा महामंडळ’ अर्थात एलआयसीने विशेष पुनरुज्जीवन मोहिमेची आपल्या पॉलिसीधारकांसाठी घोषणा केली आहे. एलआयसीच्या व्यक्तिगत आणि आरोग्य विमा पॉलिसीधारकांना या १५ जून २०१६ ते १५ सप्टेंबर २०१६ पर्यंत सुरू राहणाऱ्या मोहिमेत आपल्या रद्दबातल, व्यपगत झालेल्या पॉलिसींचे पुनरुज्जीवन काही अटी-शर्तीची पूर्तता करून विनाविलंब शुल्क भरता येणार आहे. या मोहिमेचा जास्तीत जास्त पॉलिसीधारकांनी फायदा घेऊन आपले विमा कवच अविरत सुरू ठेवण्याचे आवाहन एलआयसीने केले आहे.

जनता सहकारी बँकेला ६४.९७ कोटींचा निव्वळ नफा; चौंडेश्वरी बँकेचे विलीनीकरण
पुणे: येथे मुख्यालय असलेल्या जनता सहकारी बँकेला २०१५-१६ या आर्थिक वर्षांत ६४.९७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, बँकेचा एकूण व्यवसाय १२,८०५.०५ कोटी रुपयांवर गेला आहे. मागील वर्षी बँकेचा निव्वळ नफा ६४.६१ कोटी रुपये होता.
बँकेची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी झाली, त्यावेळी बँकेचे अध्यक्ष अरविंद खळदकर यांनी २०१५-१६ आर्थिक वर्षांतील बँकेच्या कामगिरीचा आढावा घेतला. सरलेल्या आर्थिक वर्षांसाठी सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची संचालक मंडळाने शिफारस केली आहे, अशी माहिती खळदकर यांनी दिली.
२०१५-१६ हे बँकेचे स्थापनेचे ६७ वे वर्ष होते, त्यात बँकेच्या ठेवी ६०८.३६ कोटींनी वाढून ७,६७८.३३ कोटींवर, तर कर्जवाटप ३७५.४५ कोटींनी वाढून ५,१२६.७२ कोटी रुपये झाले आहे. बँकेने या वर्षभरात एकूण १० शाखा नव्याने सुरू करून, एकूण शाखांची संख्या ५६ वर नेली. चालू वर्षांत आणखी आठ शाखा सुरू करण्यात येणार असून, गोरेगाव आणि अहमदनगर येथील शाखा नुकत्याच कार्यान्वित झाल्या आहेत. तसेच इचलकरंजी येथील चौंडेश्वरी सहकारी बँकेचे जनता सहकारी बँकेत येत्या ४ जुलैला विलीनीकरण होणार आहे. या बँकेच्या मुख्य कार्यालयासह नऊ शाखा आणि एक विस्तारित कक्ष जमेस धरल्यास, जनता बँकेच्या एकूण शाखांची संख्या ७३ वर पोहोचेल.