नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दिवसागणिक वाढ सुरू असण्याच्या काळातच, वाहनाच्या या इंधनाचा वापरही उत्तरोत्तर वाढत जाऊन करोनापूर्वीच्या पातळीलाही वरचढ ठरला आहे. सोमवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशातील इंधनाची मागणी मार्चमध्ये ४.२ टक्क्यांनी वाढून तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे.

मार्चमध्ये एकूण पेट्रोलियम उत्पादनाचा वापर १९४.१० लाख टन होता, जो मार्च २०१९ नंतरचा उच्चांक आहे, असे तेल मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण कक्षाच्या आकडेवारीने सोमवारी स्पष्ट केले. कोविड-१९ साथीच्या आजाराच्या लाटांच्या पाश आणि परिणामांतून अर्थव्यवस्थेची मुक्तता होत असल्याने सरलेल्या मार्चमध्ये वाहतुकीच्या क्रियांमध्ये वाढीसह, त्यासाठी इंधनाची मागणीही वाढल्याचे हे द्योतक असल्याचे या कक्षाने सांगितले.

देशात सर्वाधिक वापरले जाणारे इंधन अर्थात डिझेलचा वाटा हा वापरात असलेल्या सर्व पेट्रोलियम उत्पादनांमध्ये जवळपास ४० टक्के आहे, त्याची मागणी मार्चमध्ये ६.७ टक्क्यांनी वाढून ७७ लाख टन झाली आहे. काही महिन्यांपूर्वी कोविडपूर्व पातळी ओलांडलेल्या पेट्रोलची विक्रीही ६.१ टक्क्यांनी वाढून २९.१० लाख टन झाली आहे. मार्चमध्ये दोन्ही इंधनांची मागणी करोनापूर्व पातळीपेक्षा जास्त होती.

कृषी क्षेत्राकडून मागणी वाढल्याने तसेच ग्राहकांनी आणि पेट्रोल पंपांनी दरवाढीच्या अपेक्षेने केलेला साठा यामुळे डिझेलचा वापर जास्त होता.

मार्चमध्ये स्वयंपाकाच्या गॅसची (एलपीजी) मागणी ९.८ टक्क्यांनी वाढून २४.८ लाख टन झाली.

नुकत्याच म्हणजे, ३१ मार्च २०२२ ला संपलेल्या संपूर्ण आर्थिक वर्ष विचारात घेतल्यास, इंधनाची मागणी ४.३ टक्क्यांनी वाढून २० कोटी २७ लाख  टन होती, जी आर्थिक वर्ष २०२० नंतरची सर्वाधिक मागणी आहे. या काळात वाहन आणि स्वयंपाकाच्या इंधनाचा वापर वाढला असताना, इंधनाच्या औद्योगिक मागणीत मात्र घट झाली.

सरलेल्या २०२१-२२ आर्थिक वर्षांत पेट्रोलचा वापर १०.३ टक्क्यांनी वाढून ३०८.५ लाख टन झाला तर डिझेलची विक्री ५.४ टक्क्यांनी वाढून ७६७ लाख टन झाली. २०१९-२० मधील ८२६ लाख टन ही डिझेलची आजवरची सर्वाधिक वार्षिक विक्री होती, तर आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील पेट्रोलची मागणी आतापर्यंतची अत्युच्च पातळी गाठणारी आहे. एलपीजीचा वापर २०२१-२२ मध्ये तीन टक्क्यांनी वाढून २८३.३ लाख टन झाला आहे.