मुंबई : देशातील म्युच्युअल फंड गंगाजळीने वर्षांरंभीच विक्रमी नोंद केली आहे. जानेवारी २०२० मध्ये एकूण फंड मालमत्ता २७.८५ लाख कोटी रुपये या टप्प्यावर प्रथमच विराजमान झाली आहे. वर्षभरापूर्वी एकूण गंगाजळी २६.५४ लाख कोटी रुपये होती.

‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ (अ‍ॅम्फी) या देशातील विविध ४० हून अधिक फंड उद्योगांच्या संघटनेने फंड मालमत्तेच्या नव्या वर्षांच्या सुरुवातीचा प्रवास आकडेवारीतून सोमवारी स्पष्ट केला.

जानेवारीत मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडांना गुंतवणूकदारांनी पसंती दिली आहे. तर जानेवारीत एकूण एसआयपी खात्यांच्या संख्येने ३ कोटीचा आकडापार केला असला तरी महिन्यागणित वाढणाऱ्या एसआयपीचा वृद्धीदर घटल्याचे आकडेवारीत समोर आले आहे.  डिसेंबर २०१९ मध्ये एसआयपीच्या माध्यमातून ८,५१८.४७ कोटींच्या गुंतवणुकीच्या तुलनेत जानेवारी २०२० मध्ये ८,५३१.९० कोटी एसआयपीच्या माध्यमातून गुंतवण्यात आले. म्युच्युअल फंडाच्या एकूण मालमत्तेत एसआयपीद्वारे गुंतविले जाणाऱ्या मालमत्तेचा वाटा डिसेंबरमधील ३.१७ लाख कोटींवरून जानेवारीअखेर ३.२५ लाख कोटींवर गेला आहे. डिसेंबर महिन्यातील ४,४९९.३९ कोटींच्या तुलनेत जानेवारीत ७,८७७.४० कोटी म्युच्युअल फंडांच्या समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडात गुंतविण्यात आले. मागील वर्षांतील ऑगस्ट महिन्यापासुनची ही सर्वाधिक गुंतवणूक आहे.

  • जानेवारीत गुंतवणूकदारांनी सर्वाधिक पसंती मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडांना देत मिड कॅप फंडात १,७९८.१६ कोटी तर स्मॉल कॅप फंडात १,०७२ कोटींची गुंतवणूक केली आहे.
  • अ‍ॅम्फी’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार म्युच्युअल फंडाच्या सर्व योजना मिळून डिसेंबरमधील ६१,८०९.७० कोटींच्या तुलनेत जानेवारीत एकूण गुंतवणूक १.२० लाख कोटी झाली.

बीएसई स्टार एमएफ मंचावर उच्चांकी व्यवहार नोंद

मुंबई शेअर बाजाराच्या बीएसई स्टार एमएफ या म्युच्युअल फंड मंचावर  आज उच्चांकी व्यवहारांची नोंद झाली आजच्या कामकाजाच्या  कालावधीत १,०७५ कोटी मूल्याच्या १०.१० लाख व्यवहारांची नोंद झाली. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यातील ८.७९ लाख व्यवहारांचा उच्चांक होता. बीएसई स्टार एमएफ मंचावरील एप्रिल २०१९ – जानेवारी २०२० कालावधीतील व्यवहारांच्या संख्येत मागील आर्थिक वर्षांच्या या कालावधीतील व्यवहारांच्या तुलनेत ५८ टक्के वाढ झाली आहे. तर झालेल्या व्यवहारांच्या मूल्यात १६ टक्के वाढ झाल्याची माहिती मुंबई शेअर बाजाराने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात देण्यात आली. सध्या या मंचावरून १,०५८.२८ कोटी मूल्याच्या ३६.८१ लाख एसआयपीचे व्यवहार होत आहेत. या मंचावर १ फेब्रुवारी २०१९ ते १ फेब्रुवारी २०२० या कालावधीत ३२.४८ कोटी मूल्याच्या १.१३ लाख एसआयपिंची नोंद झाली आहे.

व्याजदर आवर्तनाने सकारात्मक दिशा बदल केल्याने रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडातील परताव्यात येत्या कालावधीत सुधारणा दिसेल. रिझव्‍‌र्ह बँक व्यापारी बँकांना दीर्घकालीन निधी रेपो दराने उपलब्ध करून देणार असल्याने रोख्यांच्या किंमतीत घट झाल्याने रोखे गुंतवणुकीवरील परतावा वाढण्याची असल्याने रोखे गुंतवणूक फंडात निधीचा ओघ वाढण्याची अपेक्षा आहे. आगामी आर्थिक वर्षांत म्युच्युअल फंडाच्या मालमत्तेत १५ ते २० टक्के वृद्धीची अपेक्षा आहे. नवीन करप्रणालीतील करवजावट सूट काढून टाकण्याच्या सरकारच्या निर्णयाचा ईएलएसएस फंडावर फार परिणाम होणार नाही. – एन. एस. वेंकटेशन, मुख्याधिकारी, अ‍ॅम्फी.