मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजाराचे (एनएसई)व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये यांनी जुलैमध्ये त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर, दुसऱ्यांदा नेतृत्वपद ते स्वीकारण्यास ते स्वत: इच्छुक नाहीत, असे बुधवारी स्पष्ट केले.

देशातील बाजारमंच सध्या नियामकांच्या चौकशीला सामोरे जात असून, पूर्वी घडून गेलेला गैरव्यवहार व कारभारातील त्रुटी तसेच सह-स्थान प्रकरणाशी संबंधित जुन्या घोटाळय़ांनी डोके वर काढले आहे. याच पार्श्वभूमीवर लिमये यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे त्यांचा निर्णय जाहीर केला आहे. ‘एनएसईवर नेतृत्वपदाच्या दुसऱ्या फेरीत मला स्वारस्य नाही आणि म्हणून मी त्या पदासाठी अर्ज करणार नाही, असे आपण संचालक मंडळाला कळविले आहे. प्रमुखपदासाठी नवीन उमेदवाराच्या शोधाच्या सध्या सुरू असलेल्या प्रक्रियेत सहभागी होणार नाही आणि माझा कार्यकाळ १६ जुलै २०२२ रोजी संपत आहे,’ असे लिमये यांनी या निवेदनात स्पष्ट केले आहे.

एनएसईने अलीकडेच व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. २५ मार्चपूर्वी सर्वोच्च पदाच्या भूमिकेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून, प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) प्रक्रिया राबविल्याचा अनुभव ही त्या उमेदवाराची अतिरिक्त पात्रता ठरेल.

बाजार नियामक सेबीच्या नियमानुसार, लिमये यांना थेट मुदतवाढ देता येत नसली तरी या पदासाठी अर्ज दाखल केलेल्या इतर उमेदवारांशी स्पर्धा करून त्यांना आणखी एकदा कार्यकाळ मिळविता येणे शक्य आहे. एनएसईच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सध्या सीबीआयने कारागृहात रवानगी केलेल्या चित्रा रामकृष्ण या राजीनामा देऊन बाहेर पडल्यानंतर, जुलै २०१७ मध्ये लिमये यांची या बाजारमंचाचे प्रमुख म्हणून पाच वर्षे मुदतीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

लिमये यांच्या कार्यकाळाची वैशिष्टय़े

लिमये यांच्या कार्यकाळात, एनएसईचा महसूल आर्थिक वर्ष २०१७ मधील २,६८१  कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ८,५०० कोटी रुपयांवर (अंदाजित) गेला आहे. याच कालावधीत निव्वळ नफा १,२१९ कोटी रुपयांवरून, ४,४०० कोटी रुपयांवर गेला आहे. शिवाय, या कालावधीदरम्यान भागभांडवलावरील परतावा १७  टक्क्यांवरून दुपटीने वाढत ३४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

अतिशय कठीण काळात संस्थेचे नेतृत्व करीत, एनएसईला स्थिर, मजबूत करण्यासह, या संस्थेच्या कायापालटासाठी आवश्यक सर्वोत्तम प्रयत्न केले. नियंत्रण, प्रशासन, तंत्रज्ञान, नियामक परिणामकारकता आणि व्यवसाय वाढ या सर्वच आघाडय़ांवर खूप प्रगती साधता आल्याचे सर्वासमक्षच आहे.

– विक्रम लिमये, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, एनएसई लिमिटेड