वारेमाप उत्पादनामुळे किमती सात वर्षांच्या तळात
अमेरिकेसारखा देश इंधनाबाबत स्वयंपूर्ण होत असतानाच प्रमुख तेल उत्पादक देशांनीही उत्पादन कपात न करण्याचा निर्णय न घेतल्याने, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर हे मंगळवारी जवळपास सात वर्षांच्या तळापर्यंत घसरले आहेत. अमेरिकी तेल हे प्रति पिंप ३७, तर ब्रेन्ट तेल हे पिंपामागे ४० डॉलपर्यंत खाली आले.
अमेरिका तसेच लंडनच्या बाजारात खनिज तेल प्रति पिंप ४० डॉलपर्यंत खाली आल्याने त्यांनी फेब्रुवारी २००९ नंतरचा इंधन दर तळ राखला आहे. अमेरिकेतील तेल उत्पादन दिवसेंदिवस वाढत आहे. तर प्रमुख तेल उत्पादक देशांच्या गेल्या आठवडाअखेर झालेल्या बैठकीत इंधन उत्पादनात कपात करण्याबाबतचा कोणताही निर्णय घेतला गेला नाही. परिणामी, सर्वच स्तरांवर तेलाचा अतिरिक्त साठा उपलब्ध होत असल्याने त्याचे दर आता किमान स्तरावर येऊन पोहोचले आहेत.
अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हची संभाव्य व्याजदर वाढ ठरविणारी मध्यवर्ती बँकेची बैठक येत्या १६ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे ही इंधन दरातील अस्वस्थता नोंदली जात असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
प्रत्यक्षात दरवाढ झाल्यास ती गेल्या नऊ वर्षांतील पहिली वाढ ठरेल. ‘ओपेक’चे १३ तेल उत्पादक सदस्य हे जागतिक तेल उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंतचा हिस्सा राखतात. इंधन उत्पादनात अमेरिका स्वयंपूर्ण होत असूनही या देशांनी उत्पादनात कपात करण्याचे गेल्या शुक्रवारच्या बैठकीत टाळले आहे.
हे देश प्रति दिन ३.२० कोटी पिंप तेल उत्पादन करतात. तेल उत्पादनाबाबतचा त्यांचा पुढील निर्णय २ जून २०१६ रोजी होणाऱ्या बैठकीत होईल.

आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात खनिज तेलाचे दर सप्ताहारंभीच ७ टक्क्यांपर्यंत आपटले. तेल उत्पादक देशांच्या गेल्या शुक्रवारच्या उत्पादन स्थिर ठेवण्याच्या निर्णयामुळे हे घडले आहे. सध्या प्रति दिन २० लाख पिंप उत्पादन अतिरिक्त होत आहे. परिणामी इंधन दर आता गेल्या सात वर्षांच्या तळात आहेत.
– आयएफए ग्लोबलचा अहवाल