आरोग्यविषयक वाढत्या दक्षतेनुरूप पौष्टिक अल्पोपाहार उत्पादनांच्या नव्याने विकसित होऊ पाहत असलेल्या बाजारपेठेसाठी संघटित क्षेत्रातून स्पर्धकही वाढत असून, त्यात पार्लेची नव्याने भर पडली आहे. पार्लेने ‘सिम्पली गुड’ या नाममुद्रेअंतर्गत पाचक बिस्किटांची श्रेणी बाजारात आणली आहे. 

या श्रेणीत विविध उत्पादनांची मालिका येत्या काळात सादर करण्याचे कंपनीचे नियोजन असून, सध्या एकूण बिस्किटांच्या २४,००० कोटी रुपयांच्या बाजारपेठेच्या तुलनेत अत्यल्प म्हणजे ५०० कोटींच्या घरात असलेल्या पौष्टिक बिस्किटे व अल्पोपाहाराला येत्या काळात असीम भवितव्य असल्याचा विश्वास पार्ले प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे विपणन उप-व्यवस्थापक मयांक शाह यांनी सांगितले. या नव्या बाजारपेठेचा वर्षभरात १५-२० टक्के हिस्सा आपल्या ‘सिम्पली गुड’ कुकीज्कडून काबीज केला जाईल, असा त्यांनी दावा केला. तीन वेगवेगळ्या स्वादांत ही बिस्किटे १०० ग्रॅम आणि २५० ग्रॅम अशा आकारमानात अनुक्रमे २० रुपये आणि ५० रुपये किमतीत प्रस्तुत करण्यात आली आहेत. आयटीसी, ब्रिटानिया या पाठोपाठ या नव्या बाजारपेठेत उतरलेला पार्ले हा तिसरा तगडा स्पर्धक आहे. ७५ वर्षांपासून ‘ग्लुकोज’ या बिस्किटांच्या श्रेणीत पॅकेजिंगव्यतिरिक्त तिळमात्रही बदल न करणाऱ्या पार्लेने अलीकडच्या काळात अभिजन बाजारपेठेला साद घालतील अशा अनेक उत्पादनांच्या नाममुद्रा बाजारात आणल्या असून, त्यांचा कंपनीच्या सुमारे सात हजार कोटी रुपयांच्या उलाढालीतील योगदान ३५ टक्क्यांवर गेले आहे. ‘सिम्पली गुड’ श्रेणीची त्यात नवीन भर पडली असून, हे उत्पादनही देशातील अव्वल ३० शहरांतील आधुनिक विक्री दालनांतून अधिकाधिक होणे अपेक्षित असल्याचे मयांक यांनी सांगितले.