नवी दिल्ली : जागतिक पातळीवर चिंतेचा विषय ठरलेल्या सेमीकंडक्टरच्या कमतरतेचा वाहन निर्मिती क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. सणासुदीच्या आणि पर्यायाने सर्वाधिक खपाच्या सरलेल्या ऑक्टोबर महिन्यात देशातील प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीत वार्षिक आधारावर २७ टक्क्यांची घट त्या परिणामी झाल्याचे सोसायटी ऑफ इंडिया ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्सने (सियाम) शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून दर्शविले आहे.

करोनामुळे आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये सुरुवातीच्या काळात मंदावलेल्या विक्रीची भरपाई करण्यासाठी वाहन उत्पादक सणोत्सवाच्या काळाची प्रतीक्षा करत होते. मात्र सेमीकंडक्टरचा तुटवडा आणि वाहनांच्या सुटय़ा उत्पादक घटकांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने वाहन निर्मिती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे, असे मत सियामचे महासंचालक राजेश मेनन यांनी व्यक्त केले. ‘सियाम’कडून प्रस्तुत आकडेवारीनुसार, सरलेल्या ऑक्टोबर महिन्यात २,२६,३५३ प्रवासी वाहनांची विक्री झाली, जी गत वर्षीच्या याच महिन्यात झालेल्या ३,१०,६९४ विक्रीच्या तुलनेत २७ टक्क्य़ांनी घसरली आहे. वाहन निर्मात्यांकडून वितरकांना करण्यात येणाऱ्या वाहनांच्या पुरवठय़ामध्ये देखील घसरण झाली आहे. वितरकांना करण्यात आलेल्या दुचाकींच्या पुरवठय़ामध्ये गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर (२०२०) महिन्याच्या तुलनेत यंदा २५ टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात २०,५३,८१४ दुचाकी देण्यात आल्या होत्या. यावर्षी मात्र १५,४१,६२१ दुचाकी वितरित करण्यात आल्या. मोटारसायकल वितरणाचे प्रमाणही गेल्या महिन्यात २६ टक्क्यांनी घसरून १०,१७,८७४ वर आले आहे, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत १३,८२,७४९ होते.