मुंबई : सध्या देशभरात फोफावत असलेल्या ई-कॉमर्सच्या पाश्र्वभूमीवर, विकसित देशांप्रमाणे भारतातही औषधांच्या ऑनलाइन विक्रीला परवानगी देण्याचे घाटत असून, त्या संबंधाने आवश्यक पूर्वअटींची पूर्तता, किंबहुना काटेकोर नियामक चौकटच अस्तित्वात नसल्याचे औषध विक्रेत्या संघटनेचे म्हणणे आहे.
अलीकडेच महाराष्ट्रात एका ई-व्यापारातील कंपनीला ऑनलाइन औषध विक्रीसाठी अन्न व औषध प्रशासनाकडून नोटीस आणि गुन्हा नोंदविण्यात आली. त्या संबंधाने तक्रार करण्यात पुढाकार घेणाऱ्या ‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट’चे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी कोणत्याही नियम तसेच नियंत्रणाविना होणाऱ्या ऑनलाइन औषध विक्रीला परवानगी ही सार्वजनिक आरोग्यालाच धोका निर्माण करणारी ठरेल, असा इशारा दिला. ज्या विरोधात तक्रार करून आपण उभे राहिलो त्या स्नॅपडिल प्रकरणाने असे विपरित वळण घेताना, त्यांच्या बेकायदेशीर व्यावसायिक कृतीलाच सनदशीर ठरविणारा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न व्हावा, हे अजब असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यमान कायद्याच्या चौकटीत औषधांचा ई-व्यापार बेकायदेशीरच ठरेल, कारण औषध विक्री व्यवसायात आवश्यक असलेला डॉक्टर (प्रिस्क्रायबर) घटक डावलणारा, तसेच औषधविक्रेता, रुग्ण (ग्राहक) हे बिनचेहऱ्यांचे, परस्परांपासून अनभिज्ञ असतात.