मुंबई : चालू महिन्यांत तेल कंपन्यांकडून दहाव्यांदा झालेल्या इंधन दरवाढीच्या परिणामी मंगळवारी मुंबईत पेट्रोलचे दर लिटरमागे पहिल्यांदाच ९९ रुपयांपुढे गेले. मंगळवारी सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोलच्या किमती लिटरमागे २७ पैशांनी तर डिझेलमध्ये लिटरमागे २९ पैशांची वाढ करण्यात आली. परिणामी मुंबईत एक लिटर पेट्रोलचे दर ९९.१४ रुपये, तर डिझेलचे दर ९०.७१ रुपये असे झाले आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्य़ांमध्ये पेट्रोलच्या किमतीनी शंभरी गाठली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमती प्रति पिंप ७० अमेरिकी डॉलरच्या घरात गेल्या असल्याने तेल कंपन्यांना आयात खर्च वाढला आहे आणि परिणामी देशांतर्गत इंधन दरात वाढ करणे त्यांना अपरिहार्य ठरले असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.